coronavirus : बीडमध्ये ‘दुबई रिटर्न’ महिला कोरोना संशयित; जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:57 PM2020-03-19T16:57:02+5:302020-03-19T17:06:09+5:30
आरोग्य विभागाकडून तपासणीला सुरूवात
बीड : दुबईहुन सकाळीच बीडमध्ये आलेल्या एका ७० वर्षीय महिलेला सर्दी, ताप, खोकल्यासारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर तात्काळ या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासणी करून स्वॅप घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे.
बीड शहरातील एक ७० वर्षीय महिला आपल्या बहिणीकडे फेब्रुवारी महिन्यात दुबईला गेली होती. आज पहाटे ती पुणे विमानतळावर आली. येथे तिची तपासणी करण्यात आली. परंतु लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सकाळी सहा वाजता ती बीडमध्ये पोहचली. आठ वाजेच्या सुमारास तिला खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे जाणवू लागली. तिने खाजगी दवाखाना गाठला. त्यानंतर तिच्या मुलाने ही माहिती प्रशासन व आरोग्य विभागाला दिली. त्यांना आता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांची टिम तपासणी करण्याच्या कामालाही लागली असल्याचे सांगण्यात आले. तिचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. अहवाल आल्यावरच कोरोना आहे की नाही, हे समजणार आहे.ही केवळ उपचाराची प्रक्रिया आहे. तपासणीला घेतले म्हणजे, त्या महिलेला आजार आहे, असे होत नाही. नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाची तत्परता कागदावरच
महिला दुबईहुन आल्याची माहिती वारंवार आरोग्य विभाग व प्रशासनाला दिली जात होती. परंतु केवळ गाजावाजा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या महिलेकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी महिलेच्या मुलानेच तिला साध्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेल्याची महिती आहे. आरोग्य विभागाकडून आतापर्यंत केवळ कागदोपत्रीच गाजावाजा केला जात होता. या महिलेस आरोग्य विभागाच्या पथकाने घरी जावून तपासणी करण्याची आवश्यकता होती. परंतु तसे झाले नसल्याने आरोग्य विभागाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
संपर्क अधिकारी अनभिज्ञ
कोरोनाबद्दल काही अडचण असल्यास किंवा संशयीत आल्यावर तपासणीसाठी प्रत्येक तासाला एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियूक्ती केली आहे. परंतु दुबईहुन परतलेल्या महिलेबद्दल नियूक्त केलेल्या संपर्क अधिकाऱ्यांना कसलीच माहिती नव्हती. त्यांनी आढावाही घेतला नाही. ४ ते ५ यावेळेत असणाऱ्या डॉ.अस्वले यांना विचारणा केली असता मला माहिती नाही, विचारून सांगतो, असे सांगितले. यावरून आरोग्य विभाग किती गाफिल हे स्पष्ट होते.
दुबईहुन परतलेली महिला जिल्हा रुग्णालयात आल्याचे समजले आहे. आली असेल तर तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यास सांगितले आहे. डॉक्टर, कर्मचारी लवकरच तिची तपासणी करून स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले जातील. अहवाल आल्यानंतरच पुढे समजेल.
-डॉ.अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक, बीड