CoronaVirus : अडीचशे वर्षांपासून अखंडित सुरू असलेल्या रामनवमी उत्सवाला पहिलाच खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:27 PM2020-04-01T16:27:23+5:302020-04-01T16:30:46+5:30
रामनवमी, दशमी व हनुमान जयंती असा तब्बल १५ दिवस हा उत्सव चालतो.
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई - अंबाजोगाईत गेल्या अडीचशे वर्षांपासून अखंडित सुरू असलेला राम नवमी उत्सवाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ब्रेक बसला आहे. यापूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीतही हा उत्सव शेतात साजरा व्हायचा. मात्र, गेल्या अडीचशे वर्षात उत्सव बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अंबाजोगाईत खडकपुरा परिसरात असलेले श्रीराम मंदिर व मंडीबाजार परिसरातील पाटील चौकातील श्रीराम मंदिर ही दोन्ही मंदिरे, श्री. समर्थ रामदास स्वामी, श्री. कल्याण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिराचा मोठा इतिहास आहे. पारतंत्र्यातील लोकांना प्रबोधनासाठी व बलोपसाना व राष्ट्रभक्ती केंद्रे म्हणून त्याकाळी या मंदिराकडे पाहिले जायचे. या मंदिराच्या माध्यमातून अनेक आश्रितांना व वाटसरूंना आधार म्हणून ही मंदिरे असायची. अंबाजोगाईतील या दोन्ही मंदिरांना प्राचीन काळांपासून मोठे महत्त्व आहे व जागृत देवस्थान म्हणून या दोन्ही राम मंदिराची ख्याती पंचक्रोशीत आहे.
अंबाजोगाईच्या या दोन्ही राममंदिरात रामनवमी उत्सव साजरा होतो. हा उत्सव शहरवासियांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. चैत्र प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होेते. रामनवमी, दशमी व हनुमान जयंती असा तब्बल १५ दिवस हा उत्सव चालतो. या उत्सवाच्या कालावधीत भजन, कीर्तन, प्रवचन असे समाज प्रबोधनाचे अनेक उपक्रम राबविले जातात. रामनवमीच्या दिवशी जन्मोत्सवासाठी हजारो भाविकांनी गर्दी तर दशमीच्या दिवशी महाप्रसादासाठी तेवढीच गर्दी होते. नवमीमच्या कालावधीत दररोज रात्री होणारे संगीत भजन, ढोलकी, झांजा व मधुर आवाजात सादर होणारी रामगीते हे शहरवासियांचे मोठे आकर्षण आहे. पिढया न ्पिढया सुरू असलेला हा उत्सव भाविकांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच या उत्सवासाठी बाहेरगावी असणारे भाविकही उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. व या उत्सवातून अनेकांना वर्षभराची नवी ऊर्जा मिळते. असा या उत्सवाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ब्रेक लागले आहे. या उत्सवासाठी पुढाकार घेणारे मठाधिपती नागनाथबुवा रामदासी, गदाधरबुवा रामदासी, कल्याणबुवा रामदासी,श्रीहरी रामदासी, प्रकाश पुसरेकर यांना या वर्षीचा हा उत्सव भाविकाविना साजरा करण्याची वेळ आली आहे.
प्लेगच्या साथीतही साजरा होत असे उत्सव
अडीचशे वर्षाची परंपरा असलेला हा रामनवमीचा उत्सव अखंडित सुरू आहे. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात दोन वेळा प्लेगची मोठी साथ निर्माण झाली. या काळात संपूर्ण गावं ओस पडले होते. मात्र, हा रामनवमीचा उत्सव भाविकांनी व मठाधिपतींनी शेतात साजरा केला होता. अशी माहिती मठाधिपती गदाधरबुवा रामदासी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.