कोरोनापाठोपाठ ‘म्युकरमायकोसिस’ने पसरले हातपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:33 AM2021-05-26T04:33:45+5:302021-05-26T04:33:45+5:30
सोमनाथ खताळ बीड : अगोदरच कोरोनाने थैमान घातलेले असताना आता आणखी ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराने हातपाय पसरले आहेत. मागील ...
सोमनाथ खताळ
बीड : अगोदरच कोरोनाने थैमान घातलेले असताना आता आणखी ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराने हातपाय पसरले आहेत. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात तब्बल ७४ रुग्ण आढळले आहेत. यातील केवळ ११ जण बरे झाले असून, ८ जणांचा बळी गेला आहे. जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत अथवा कोरोनामुक्त झाले आहेत, अशांनाच याची लागण झाल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसऱ्या लाटेत कोरोनाने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडवली. जवळपास एक हजार लोकांचा बळीही गेला; परंतु मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत होता; परंतु आता ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. शरीराच्या विविध भागांत पसरू शकणाऱ्या या बुरशीचा रंग वेगवेगळा आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना याची पटकन लागण होते. साधारणत: श्वसननलिका, नाक आणि डोळ्यांभोवतालची हाडे यामध्ये ही बुरशी होते. त्याचा मेंदूपर्यंत प्रसार होऊ शकतो. जोपर्यंत अवयापर्यंत ही बुरशी आहे, तोपर्यंत जीवितास धोका कमी असतो; परंतु मेंदूपर्यंत पोहोचल्यावर यास जास्त धोका असतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सोमवारीच स्पष्ट केले आहे.
काय आहेत लक्षणे
डोळ्यांभोवती वेदना होणे, डोळे लाल होणे, ताप येणे, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या होणे, मानसिक स्थिती बदलणे, गाल दुखणे/सुजणे, डोळे दुखणे/सुजणे, दृष्टी अधू होणे, डोळ्यांपुढे दोन प्रतिमा दिसणे, नाक दुखणे व ते सतत वाहू लागणे, दात हलू लागणे, अशी ‘म्युकरमायकोसिस’ची लक्षणे आहेत.
डायबेटिस असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी
आतापर्यंत आढळलेल्या ७४ पैकी ६८ रुग्णांना डायबेटिस आहे. यावरून या लोकांना याचा अधिक धोका असल्याचे स्पष्ट होत आहे, तसेच स्टेरॉइड थेरपीचा वापर केलेल्यांची संख्या ५६ आहे.
ज्येष्ठांनो, दुर्लक्ष करू नका
कोरोनाचा धोकाही ज्येष्ठांनाच जास्त होता. आतापर्यंत झालेल्या कोरोना बळींमध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. आता ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांमध्येही तब्बल ३१ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत. १८ वर्षांच्या आतील केवळ १ रुग्ण आहे.
---
काय म्हणतात वैद्यकीय तज्ज्ञ
नाक, डोळ्यांना थोडाही त्रास जाणवायला सुरुवात झाली की तात्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोरोनापाठाेपाठ आता ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण वाढत आहेत. आपण काळजी घेतली तर या बुरशीजन्य आजाराची लागण होणार नाही. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी.
डॉ.आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
१३ मे रोजी जिल्ह्यात पहिला रुग्ण सापडला. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ७४ झाली आहे. आपल्याकडे बीड जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मिळालेली आहे. अंबाजोगाईत सध्या उपचार होत असून, बीडमध्ये स्वतंत्र वॉर्ड आणि मनुष्यबळ उपलब्ध केले जात आहे.
डॉ. बाबासाहेब ढाकणे, नोडल ऑफिसर, बीड
---
अशी आहे आकडेवारी
एकूण रुग्ण ७४
उपचाराखाली ५५
बरे झालेले ११
मृत्यू ८
---
वयोगटानुसार आकडेवारी
० ते १८ - १
१८ ते ४५ - १८
४५ ते ६० - २४
६० वर्षांवरील - ३१
---
लिंगनिहाय आकडेवारी
पुरुष ५०
महिला २४
---
ऑक्सिजन लागलेले रुग्ण २९
ऑक्सिजन न लागलेले रुग्ण ४५
---
डायबेटिस असलेले रुग्ण ६८
कोमॉर्बिड असलेले १
इतर ५
---
कोरोना इतिहास असलेले ७४
कोरोना इतिहास नसलेले ००