CoronaVirus : सीमेवर लढून सेवानिवृत्त झाले; घरी येताच पत्नीने क्वारंटाईन केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 06:43 PM2020-04-29T18:43:59+5:302020-04-29T20:18:57+5:30
देशभक्तीची जान असलेले फौजी आणि कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या आशा स्वयंसेविकेच्या समजूतदारपणाला सर्वस्तरातून सलाम केला जात आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : देशाच्या रक्षणासाठी सिमेवर लढले. आता सेवानिवृत्त होऊन घरी परतले. इकडे कोरोना लढ्यात बाहेरून येणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण करणाऱ्या आणि पत्नी असलेल्या आशा स्वयंसेविकेने त्यांना तात्काळ क्वारंटाईन करून शेतात पाठविले. देशभक्तीची जान असलेले फौजी आणि कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या आशा स्वयंसेविकेच्या समजूतदारपणाला सर्वस्तरातून सलाम केला जात आहे. पाटोदा तालुक्यातील माळेकरवाडी येथे मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे.
आशाबाई टेकाळे (माळेकरवाडी ता.पाटोदा) या डोंगरकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काम करतात तर त्यांचे पती संजय माळेकर हे जबलपूर (मध्य प्रदेश) येथे फौजी होते. ३१ मार्च रोजी ते सेवानिवृत्त झाले. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना घरी परतता आले नाही. त्यांनी कायदेशीर परवानगी घेत मंगळवारी दुपारी ते गावात परतले. इकडे आशाबाई या गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेत होत्या. ५७ लोकांची नोंद झाल्यावर ५८ वी नोंद ही पतीची घ्यावी लागली. नाते हे अतुट असले तरी कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आशाबार्इंनी क्षणाचाही उशिर न करता त्यांना शेतात पाठवून क्वारंटाईन केले. हा सर्व प्रकार ग्रामस्थ पहात होते.
दरम्यान, आशा स्वयंसेविकांच्या अशा प्रामाणिक कर्तव्यामुळेच विदेश अथवा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची नोंद तत्परतेने झाली. त्यांची काळजी घेण्यात आरोग्य विभागाला सुकर झाले. ज्यांना लक्षणे जाणवली त्यांना तात्काळ आयसोलेशनमध्ये पाठविले. त्यामुळेच बीड जिल्ह्याचा कोरोनाचा शुन्य कायम राहिला आहे. त्यामुळे अशा आशा स्वयंसेविकांच्या कर्तव्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. आशा टेकाळे यांच्या कर्तव्याची माहिती समजताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे, डोंंगरकिन्हीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर शिंदे, डॉ.सुमेधा भोंडवे यांनी त्यांचे स्वागत केले.
शिस्तप्रिय, नियम अन् सुचनांचे पालन
मी फौजी आहे. आम्हाला शिस्तीचे धडे दिले जातात. सध्या सर्व देशभरात कोरोनाचे संकट आहे. त्याला रोखण्यासाठी प्रशासनाने विविध नियम घालून देत सुचना केल्या आहेत. याच सुचनांचे पालन करीत मी क्वारंटाईन झालो. माझ्यामुळे कुटूंब व ग्रामस्थांना त्रास होणार नाही, याची आपण काळजी घेत असल्याचे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे आशाबाई सांगतात. सुरक्षित आंतर ठेवूनच पुढील २८ दिवस त्यांची काळजी घेऊ, असेही आशाबाई म्हणाल्या.