CoronaVirus : आदेश डावलून इंधन विक्री; माजलगावात पेट्रोल पंप सील करून गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 01:39 PM2020-04-03T13:39:17+5:302020-04-03T18:51:50+5:30
माजलगाव तहसील प्रशासनाची कार्यवाही
माजलगाव : माजलगाव गढी राष्ट्रीय महामार्ग 222 वरील सावरगाव नजीक असलेल्या पसायदान पेट्रोल पंपातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यामुळे पंप सील करण्यात आला. तसेच पंप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई येथील तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्या आदेशाने नायब तहसिलदार सुनिल पत्की यांनी केली त्यामुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देशातील आपतकलीन परिस्थीती बाबत दि. २६/३/२०२० रोजी काढलेल्या आदेशानुसार आत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही पेट्रोल/डिझेल देता येणार नसल्याचे आदेश व तशा सूचना जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांना दिल्या होत्या. मात्र माजलगाव गढी रस्त्यावर सावरगाव नजीक इंडियन ऑईल कंपनीचा पसायदान पेट्रोल पंपावर खासगी व्यक्तीस डिझेल दिल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी तात्काळ नायब तहसिलदार सुनिल पत्की यांना पेट्रोल पंप सील करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे या पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी माजलगाव ग्रामिण पोलिस ठाण्यात मंडळ अधिकारी कोमटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.