coronavirus : लग्नासाठी नातेवाईक जमवले; वधू-वराचे आईवडील, भटजी आणि फोटोग्राफर पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 07:04 PM2020-03-19T19:04:43+5:302020-03-19T19:05:58+5:30
जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलला
माजलगाव : कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावणाऱ्या भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना गुरुवारी पोलीस कोठडींची हवा खावी लागली. ही घटना तालुक्यातील ब्रम्हगाव येथे घडली.
माजलगाव शहरापासून 1 किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास लग्नासाठी जमाव जमला असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली. यावरून त्यांनी शहर पोलीसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेवून लग्नस्थळी गेले असता. यावेळी पोलिसांना लग्नस्थळी 100-125 लोक जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याची उदघोषणा करुन जमलेल्यांना परत जाण्यास सांगितले. यास नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे पोलीसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केले. यानंतर 5-6 नातेवाईकांनी सदरचे लग्न उरकुन घेतल्याची माहिती आहे. ही कारवाई पो.हे.शरद पवार, पो.ना.किशोर राऊत, पो.ना.अजय सानप, पोहेका ज्योती कापले, चालक विनायक अंकुशे आदींनी केली. या घटनेने येत्या काही दिवसात लग्न असणाऱ्या नातेवाईकांमध्ये खळबळ माजली आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल :
विठ्ठल पांडुरंग कांबळे रा.ब्रम्हगाव ता.माजलगाव (नवरीचे वडील),
मनकर्णा सुभाष पाटोळे रा लवुळ ता.माजलगाव (नवरदेवाची आई),
ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे रा.लवुळ( नवरदेवाचे चुलते),
चंदू महादेव आटवे रा.लवुळ(नवरदेवाचे मामा),
कैलास सुदाम कसाब रा.गोळेगाव ता.परतुर(नवरीचा मामा),
सुनील सुदाम वैराळ रा.सांवगी ता.परतुर(सोकान्या),
स्वप्निल अनिल कुलकर्णी रा.डेपेगाव ता.माजलगाव (भटजी),
गणेश अनंत मारगुडे रा.खानापुर(फोटोग्राफर) यांचा समावेश होता.