CoronaVirus : बीडकरांना आनंदाची बातमी; प्रशासन आणि जनतेच्या एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 08:17 PM2020-04-23T20:17:09+5:302020-04-23T20:20:24+5:30
सध्या जिल्ह्यात एकही कोरोना संशयित अथवा पॉझिजिव्ह रुग्ण नाही.
बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कोरोनाग्रस्ताचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर १४ दिवसांनी दुसऱ्यांदा दोन स्वॅब घेतले असता ते देखील निगेटिव्ह आले आहेत. यामुळे बीड जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे. बीडकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अहमदनगर जिल्ह्यात जमातमध्ये गेलेल्या पिंपळा येथील एका ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. याचा अहवाल ८ एप्रिल रोजी आला होता. त्यानंतर आता नियमाप्रमाणे १४ दिवसांनी पुन्हा त्याचा दोनवेळा स्वॅब घेतला होता. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता बीड जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकही कोरोना संशयित अथवा पॉझिजिव्ह रुग्ण नाही. दरम्यान, जिल्ह्यातील आतापर्यंत पाठविलेले सर्व 170 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ही माहिती दिली.
प्रशासन, जनतेचे यश
कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने सुरूवातीपासूनच प्रयत्न केलेले आहेत. पोलीस, आरोग्य, शिक्षण, कृषी, महसूल, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नगर पालिका आदींचा या यशात सहभाग आहे. तसेच जनतेनेही सहकार्य केल्यामुळे बीड जिल्ह्यात पिंपळ्यानंतर दुसरा रुग्ण आढळला नाही. आता यापुढेही अशीच काळजी घेणे गरजेचे आहे.