CoronaVirus : माजलगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य : आ. प्रकाश सोळंके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 06:03 PM2020-04-28T18:03:07+5:302020-04-28T18:06:04+5:30
माजलगावात ५७ हजार नागरिकांची फिवर स्क्रींनिंग;
माजलगाव : माजलगाव मतदारसंघात जनतेला आरोग्य सेवेची कमतरता भासू देणार नसल्याचा विश्वास देत नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याची ग्वाही आ. प्रकाश सोळंके यांनी शहरात सुरू असलेल्या फिवर स्क्रीनींग तपासणी करतेवेळी नागरिकांशी संवाद साधताना दिली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ५७ हजार लोकांची फिवर स्क्रींनिंग तपासणी झाली असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली . याप्रसंगी सभापती अशोक डक उपस्थिती होते.
कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने सर्तकता बाळगत आरोग्य विभागाकडून नागरिकांची स्क्रीनिंग केली जात आहे. मागील काही दिवसांमध्ये परजिल्ह्यांतून मोठ्या संख्येने लोक मतदारसंघात परत आले आहेत. त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले जात आहेत, आजाराची लक्षणे असणाऱ्यांची तपासणी या कक्षात केली जात असल्याची माहिती आ. सोळंके यांनी या प्रसंगी दिली. तसेच मतदारसंघात प्रत्येक गावोगावी जावून फिवर स्क्रीनिंग तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत केली जाईल असेही आमदार सोळंके यांनी स्पष्ट केले.
मंगळवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता फिवर स्क्रीनिंग तपासणीला सुरुवात झाली. यावेळी शहरात डाॅक्टरांच्या टीमने टेम्प्रेचर गनच्या साहाय्याने दुपारपर्यंत जवळपास ५७ हजार नागरिकांची फिवर स्क्रींनिग तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. या टेम्प्रेचर गनच्या सहाय्याने काही अंतरावरून तापाची नोंद केली जात आहे. ४० डिग्रीपेक्षा अधिक ताप असलेल्या नागरिकांना उपचार देणे सोयीचे होते. त्याच प्रमाणे १०० डिग्रीपर्यंत ताप नोंद झाला तर त्यास हायरिस्क असे समजले जाते.
दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक 11मध्ये नगरसेवक शेख मंजूर, सिद्धेश्वर अर्बन चेअरमन सुनील रूद्रवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर,डॉ. महादेव कुरे,यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची फिवर स्क्रींनिग तपासणी केली