CoronaVirus : ‘होम क्वारंटाईन’ लोक घराबाहेर पडताच वाजणार घंटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 01:21 PM2020-04-01T13:21:38+5:302020-04-01T13:26:55+5:30
पुरावा दाखविणाऱ्या ‘होम क्वारंटाईन मॉनिटरींग अॅप’ची केली निर्मिती
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोना संशयितांना आरोग्य विभागाकडून होम क्वारंटाइन केले जात आहे. त्यांच्यावर यंत्रांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. एखादा व्यक्ती क्वांरटाईन असतानाही घराबाहेर पडला तर अवघ्या सेकंदात नियंत्रणात कक्षात ‘घंटी’ (सुचना) वाजणार आहे. आणि मोबाईल घरात ठेवून बाहेर आल्यास गावातील टीम लक्ष ठेवेल. यासाठी आरोग्य विभागाने ‘होम क्वारंटाईन मॉनिटरींग अॅप’ची निर्मिती केली आहे. पूर्वीचे लाईफ ३६० हे अॅप बंद केले जाणार आहे.
विदेशासह परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची चेकपोस्टवर नोंद घेऊन तपासणी केली जाते. तसेच त्यांना १४ दिवसांसाठी घरातच अलगीकरण केले जाते. तरीही काही लोक बाहेर पडत असल्याचे लक्षात आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य विभागाला अपडेट करीत यंत्रांची मदत घेतली. जे लोक क्वारंटाईन केले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये ‘होम क्वारंटाईन मॉनिटरींग अॅप’ कार्यान्वित केले आहे. याला घराची सिमा दिली आहे. याचे नियंत्रण प्रत्येक तालुक्यातील स्वतंत्र कक्षात केले जात आहे. घराची सिमा ओलांडून एक पाऊलही घराबाहेर टाकल्यास नियंत्रण कक्षात सुचना मिळणार आहे. अवघ्या सेकंदात संबंधित व्यक्तीला संपर्क करून एक समज दिली जाईल. त्यानंतरही तो बाहेर पडल्याचे दिसल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे.
दरम्यान, एखाद्याने डोके लावून जीपीएस बंद केले किंवा मोबाईल घरात ठेवत बाहेर आल्यास त्याच्यावर नजर ठेवण्यासाठीही कोतवाल, पोलीस पाटील आणि ग्रा.पं.शिपायाची नियूक्ती केली आहे. जीओ फेसींग आणि लाईव्ह ट्रॅकिंग असे दोन टप्पे यामध्ये असतील. यातून एकही संशयीत सुटणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत, अशांवर गावातील पथकांमार्फत नजर ठेवली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिका-यांना याबाबत पत्र काढले आहे.
सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू
बाहेरून आलेल्या लोकांची नोंदणी, तपासणी करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून प्रत्येक गावात आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. एखाद्याला लक्षणे जाणवले तर तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांना सुचना केली जाईल. पथक गावात जावून तपासणी करून उपचार करतील. गंभीर असल्यास त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जाणार आहे. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार हे नियंत्रण ठेवणार आहेत.
एकवेळ समज,नंतर कारवाई
‘होम क्वारंटाईन’ असलेल्या लोकांवर आता पुरावा दाखविणाऱ्या मोबाईल अॅपद्वारे नजर असेल. घरातून बाहेर पडताच आम्हाला सुचना मिळतील आणि संबंधिताला तात्काळ कॉल केला जाईल. एकवेळा समज दिल्यानंतरही चुका केल्यास कारवाई केली जाईल. सर्वेक्षणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे.
- अजित कुंभार,मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड