coronavirus : 'मास्क का लावले नाही' विचारताच पत्रकारांना केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 02:02 PM2020-03-21T14:02:09+5:302020-03-21T14:02:31+5:30
तुम्ही आम्हांला प्रश्न विचारणारे कोण असे म्हणत अचानक हल्ला केला
परळी: धर्मापुरी रोडवरील एका सिमेंट कंपनीत वार्तांकना दरम्यान पत्रकारांनी 'मास्क का लावले नाही' असे विचारल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांने त्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पत्रकार दत्तात्र्यय काळे यांनी फिर्याद असून त्यावरून रात्री उशीरा संभाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पत्रकार दत्ता काळे, संभाजी मुंडे, महादेव शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी धर्मपुरी रोडवरील एका सिमेंट कंपनीत वार्तांकनासाठी गेले होते. यावेळी पत्रकारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे काळजी कशाप्रकारे घेत आहात? मास्क का लावला नाही? असे तेथील कर्मचाऱ्यांना विचारले. तेव्हा तेथील कर्मचारी संतप्त झाले आणि त्यांनी पत्रकारांना, तुम्ही आम्हांला प्रश्न विचारणारे कोण असे म्हणत अचानक हल्ला चढविला असल्याची तक्रार दत्तात्रय काळे यांनी दाखल केली आहे.
हल्ल्यात यात दत्तात्रेय काळे व महादेव शिंदे हे जखमी आहेत. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनंतर रात्री उशिरा पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम 2017 तथा भा. द. वि. कलम 323, 504, 506 व 34 तूर्तास अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस उपाधीक्षक राहुल धस करत आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करण्यात आले.