CoronaVirus: आता बीड जिल्ह्यातील संशयितांचे अहवाल येणार औरंगाबादच्या प्रयोगशाळेतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:23 PM2020-04-09T17:23:17+5:302020-04-09T17:24:57+5:30
औरंगाबादमध्ये सुरू झाली आहे प्रयोगशाळा
बीड : बीड जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब आता यापुढे औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. यापूर्वी पुण्याला पाठविण्यात येत होते.
कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता आरोग्य विभागाने तपासणी प्रयोगशाळाही वाढविल्या. यात औरंगाबादचाही समावेश होता. बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या सर्व रुग्णांचे अहवाल आता औरंगाबादला पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे वेळ व त्रास कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच लवकरात लवकर हे अहवाल प्राप्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, आष्टी येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळताच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा लोकांचे स्वॅब घेण्यात आले. या सर्वांचे अहवाल औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. पहिल्यांदाच बीडचे अहवाल औरंगाबादला पाठविल्याचे जिल्हा शल्य चिकित्कस डॉ.अशोक थोरात यांनी ‘लोकमत’ला सांगितले.