CoronaVirus : ओ, मावशी, मामा.. रांगेत थांबा अन् सांगा सर्दी, ताप, खोकला आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 01:07 PM2020-04-23T13:07:20+5:302020-04-23T13:08:34+5:30
चेक पोस्टवर येताच ऊसतोड मजुरांची थर्मल गनद्वारे तपासणी केली जात आहे.
बीड : ओ, मावशी, दादा, भैय्या, काका, मामा... कारखान्यावरून आला आहात ना, तर रांगेत थांबा. एक एक पुढे या आणि सांगा सर्दी, ताप, खोकल्याचा काही त्रास आहे का? असे संभाषण सध्या प्रत्येक चेक पोस्टवर होत आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ऊसतोड मजुरांची चौकशी करून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.
रोजगारासाठी साखर कारखान्यावर गेलेले ऊसतोड मजूर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात परतू लागले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी जिल्ह्यातील १९ चेक पोस्टवर केली जात आहे. यासाठी आरोग्य, पोलीस, शिक्षक, कृषी, महूसल विभागाचे अधिकारी, कर्मचारी असलेले पथक तैनात केले आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून माहिती घेतली जात आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होत आहे का? असे विचारले जात आहे. एखाद्याला थोडेही लक्षणे दिसताच त्याला बाजूला घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आजारानुसार त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत. यासाठी डॉक्टरांचे पथक चेक पोस्टवर २४ तास नियूक्त केलेले आहेत.
सुदैवाने, एकालाही लक्षणे नाहीत जिल्ह्यात १२ हजार (मंगळवारी रात्रीपर्यंत) ऊसतोड मजूरांनी प्रवेश केलेला आहे. त्यांच्यापैकी एकालाही कोरोनाची लक्षणे अद्याप तरी जाणवलेले नाहीत. त्यांना २८ दिवस क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. एवढे मोठे प्रवेश होऊनही कोणालाच लक्षणे नसने, ही बाब दिलासादायक आहे.
क्वारंटाईन केलेल्यांनी सूचनांचे पालन करा
प्रत्येक मजुराची रितसर वैद्यकीय तपासणी केली जात आहे. अद्याप कोणालाच कोरोनाची तीव्र लक्षणे जाणवलेली नाहीत. प्रत्येक चेक पोस्टवर पथकांची नियुक्ती केलेली आहे. क्वारंटाईन केलेल्या लोकांनी सुचनांचे पालन करावे.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड