CoronaVirus :...अन्यथा कारवाई ! दिल्लीतील मरकजला जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 06:21 PM2020-04-06T18:21:47+5:302020-04-06T18:22:17+5:30
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा इशारा
बीड : दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज व उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा यासह देशाच्या इतर भागात झालेल्या जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या व तेथे जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वेच्छेने येत्या 24 तासात माहिती द्यावी. कोणतीही भीती न बाळगता स्वतःहून पुढे यावे आणि आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
कोरोना विषाणू प्रतिबंध हाच उपाय असल्याने आपले कुटुंबीय आपले मित्र परिवार समाज गाव हे या संसर्गापासून वाचवण्यासाठी सहकार्य करावे. दिल्लीतील मरकज येथील मेळाव्यात सहभागी परदेशी नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले असून त्यातील अनेकांचा मृत्यू झाला आहे. जमातच्या कार्यक्रमातून आल्यानंतर काही नागरिक जिल्ह्यात थांबले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या परिसरात गावात अशा व्यक्ती असतील तर त्यांची माहिती प्रशासनास द्यावी,कुठलीही मदत लागल्यास 02442-222604 या क्रमांकावर वर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
...अन्यथा कारवाई
जमात या कार्यक्रमात आपण सामील झाले होते ही माहिती आपण लपवून ठेवली व भविष्यात बाधित आढळून आल्यास जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल आपणा विरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठ चे कलम 269, 270 व 188 नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिला.