coronavirus : संचारबंदीत ढील मिळताच खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 04:18 PM2020-03-24T16:18:15+5:302020-03-24T16:19:42+5:30
बुधवारी गुढीपाडवा असल्याने नागरिकांची घाईघाईत खरेदी
माजलगाव : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लॉक डाऊन व संचारबंदीच्या आवाहनाला जनतेतून सहकार्य मिळत असून मंगळवारी लोकांनी आपापल्या घरी राहणे पसंत केले . बुधवारी गुडीपाडवा असल्याने मात्र संचारबंदी शिथिलच्या काळात सकाळी 11 ते 3 या काळात किराणा साहित्य, भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाली असल्याचे दिसून आले.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूला नागरिकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला.मात्र शासनाने ३१ मार्च पर्यंत लॉक डाऊनचा व नंतर रात्री १२ ते सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदीचा निर्णय घेतल्यानंतर लोक हवालदिल झाले. घराघरात पुरेसे खाण्यापिण्याचे किराणा साहित्य,भाजीपाला, दूध नसल्याने ते खरेदी करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता लोक बाहेर पडले. या संचारबंदीमध्ये किराणा,औषधी, वैद्यकीय सेवा ,इंधन हीच दुकाने उघडी असल्याने लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती, मात्र पोलिसांनी गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेतली.
तहसीलदार प्रतिभा गोरे,पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी लोकांना विनाकारण न रेंगाळता गर्दी न करता आपल्या घरी जाण्याचे व जवळजवळ न थांबण्याचे वारंवार आवाहन करताना दिसत होते.
ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यात गेलेले कामगार ट्रक-ट्रॅक्टर यामधून परत येत आहेत, या बरोबरच पुणे-पिंपरी चिंचवड या ठिकाणी कामधंदा करणारे येथील रहिवासी परत आले आहेत मात्र त्यांची माहिती कोणी भीतीपोटी देत नाही, अशा लोकांची तपासणी करणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी कोणी गंभीर नाही. जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन शहरातील आजादनगर, गौतमनगर या भागासह जेथे ऊसतोड कामगार राहतात त्या ठिकाणची माहिती घेऊन तात्काळ पुढील पाऊल उचलणे गरजेचे आहे.