CoronaVirus : सुखद ! अहमदनगर येथे उपचारानंतर कोरोनामुक्त रुग्ण बीडला परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 03:48 PM2020-04-24T15:48:59+5:302020-04-24T15:49:38+5:30
शुक्रवारी दुपारी तो कोरोनामुक्त होऊन गावी परतला आहे. बीड व अहमदनगरच्या विभागाने ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील ६३ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णावर अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी दुपारी तो कोरोनामुक्त होऊन गावी परतला आहे. बीड व अहमदनगरच्या विभागाने ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
अहमदनगर येथे जमातमध्ये गेलेल्या पिंपळा येथील ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर ७ एप्रिलपासून अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री १४ दिवसानंतर घेतलेले दोन्ही स्वॅब निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त असल्याचे घोषित केले. त्यामुळे बीड जिल्हा कोरोनामुक्त झाला. शुक्रवारी दुपारी नगर येथील रुग्णालयातून त्याला सुटी देण्यात आली. १०८ रुग्णवाहिकेतून त्याला घरी पाठवण्यात आले.
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार हे दोघे नगर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्या संपर्कात होते.
नगरच्या आरोग्य विभागाचे कौतुक
नगर जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ४ कोरोनामुक्त रुग्णांना घरी पाठवण्यात आले. यात आलमगीरचे २, सर्जेपूर येथील १, तर पिंपळ्याच्या एका रुग्णाचा समावेश होता. या चौघांनाही घरी पाठवताना संपूर्ण आरोग्य प्रशासन एकत्र आले होते. या रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी पाठवणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, कक्ष सेवकांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.