CoronaVirus : पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या डॉक्टरला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 04:08 PM2020-04-04T16:08:29+5:302020-04-04T16:09:07+5:30

डॉक्टराने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला

CoronaVirus: Police detain doctor who patrolled police | CoronaVirus : पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या डॉक्टरला पोलीस कोठडी

CoronaVirus : पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या डॉक्टरला पोलीस कोठडी

googlenewsNext

अंबाजोगाई : संचारबंदीच्या बंदोबस्तावर असलेले राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपी) जवान चौकशीसाठी गाडी थांबवण्याचा इशारा करत असतानाही गाडी न थांबवता त्यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ.नितीन पोतदार याला सह.दिवानी कनिष्ट स्तर न्यायदंडाधिकारी एे.के.चौगुले यांनी ९ एप्रील पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते ९.३० ही वेळ खरेदीसाठी ठेवण्यात आली आहे. इतर वेळी कोणीही घराबाहेर येऊ नये. असे शासकीय आदेश आहेत. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंबाजोगाई शहरात एसआरपीची एक तुकडी पाचारण करण्यात आली असून गुरुवारी दुपारी त्यांनी बंदोबस्ताला सुरुवात केली. या तुकडीतील सहा. फौजदार अशोक  साहेबराव प्रधान, पो.ह. मालकर, राठोड, भदरगे, शेख, खाडे, सानप, गलबे, जयवड आणि अंबाजोगाई शहर ठाण्यातील संजय बारगजे, घोळवे यांना बसस्थानकावर बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. सहा. फौजदार प्रधान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री ८.३० वाजताच्या सुमारास डॉ. नितीन पोतदार परळीकडून चारचाकी गाडीतून आले. पोलिसांनी सदरील गाडी थांबविण्यासाठी इशारा केला परंतु, डॉ. पोतदार यांनी न जुमानता गाडी तशीच पुढे नेली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वळवून पुन्हा बस स्थानकाकडे आणली. 

यावेळी मात्र पोलिसांनी ती गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता डॉ. पोतदार यांनी गाडी न थांबवता त्यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गाडीतून उतरत मद्यधुंद असलेल्या डॉ. पोतदार यांनी मी आर्मीचा मोठा अधिकारी आहे, तुम्ही माझी गाडी कशी अडवली असे म्हणत शिवीगाळ सुरु केली. तुम्हाला व्यवस्थित नोकरी करायची कि नाही, तुमची बघतो अश्या धमक्या दिल्या. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा डॉ. नितीन पोतदार यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामकाजात अडथळा केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी सह दिवानी कनिष्ट स्तर न्यायदंडाधिकारी एे. के. चौगुले यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता डॉ. पोतदार याला ९ एप्रील पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: CoronaVirus: Police detain doctor who patrolled police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.