CoronaVirus : थेट भाजीपाला विक्रीत शेतकऱ्यांना अडचणी; धनंजय मुंडेंनी 'असा' दिला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:25 PM2020-04-17T17:25:22+5:302020-04-17T17:30:23+5:30
भाजीपाला विकत घेऊन गैरसोय केली दूर, नंतर शहरात गरजूंना मोफत वाटप केला
परळी (संजय खाकरे) : शहरातील भाजीपाला विक्री चे बीट बंद असल्याने ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादकांची तारांबळ उडत आहे, तालुक्यातील जवळपास १०० भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी शहरात गैरसोय झाल्याने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाकडे शुक्रवारी सकाळी धाव घेतली.
धनंजय मुंडे यांनी तात्काळ या सर्व शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना आधार दिला आहे. ना. मुंडेंनी अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा भाजीपाला त्यांच्या 'नाथ प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेमार्फत विकत घेतला असून तो नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकरवी शहरातील गरजू नागरिकांना मोफत वाटप केला आहे.
परळीत फळे व भाजीपाला सुरळीत पुरवठा करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री बुधवार पासून सुरू करण्यात आली आहे ,काही शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादन जास्त प्रमाणावर आहे, अशा शेतकऱ्यांना दररोज तो शहरात आणून गल्लोगल्ली फिरून विकणे शक्य होत नाही, तसेच काही शेतकरी/व्यापारी वयोवृद्ध असल्यामुळे त्यांनाही फिरून विकण्याची अडचण होते, शिवाय बऱ्याच जणांना विकण्यासाठी वाहनांची अडचणही आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी ना. मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाकडे धाव घेत आपली कैफियत मांडली.
काही शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्याच्या कडेला बसून विकण्याबाबत परवानगी मागितली आहे तर काहींनी भाजीपाला ठोक विक्रीचे बीट सुरू करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ असेही ना. मुंडे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना यावेळी सांगितले.
सबंध जिल्ह्यासाठी भाजीपाला विक्रीसाठी घालून दिलेले नियम व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसांच्या आत निर्णय घेऊ, कोणत्याही स्वरूपात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी ना. मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
यावेळी परळी तहसीलदार विपिन पाटील ,नायब तहसीलदार बाबूराव रुपनर ,,नपचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे व इतर अधिकारी, शेतकरी व व्यापारी,नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या बैठकीसह ना. मुंडे यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत विशेष खबरदारी घेतल्याचेही दिसून आले.