Coronavirus: दारूसाठी क्वारंटाईन व्यक्तीची वसतिगृहाच्या कपाऊंडवरून उडी; पत्नीस मारहाण केल्याने आले उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 06:45 PM2020-04-27T18:45:06+5:302020-04-27T18:46:07+5:30
मारहाण झालेल्या महिलेने सांगितली व्यथा
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : परजिल्ह्यातील साखर कारखान्यावरून आलेल्या ऊसतोड कामगारांना केसापुरी कॅम्प येथील वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. मात्र, यातील काहीजण दारू पिण्यासाठी वसतिगृहाच्या जवळपास १० फूट उंच कंपाउंडवरून उडी मारून बाहेर जात असून यातील एकाने दारू पिऊन आपल्या पत्नीस मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराची प्रशासन व पोलिसांना दोन दिवसानंतर देखील भनक नव्हती.
माजलगाव तालुक्यातील रेणापूरी , फुले पिंपळगाव , शेलापुरी ,ब्रम्हगाव , वडगाव आदी गावातून नागपुर जिल्ह्यात उसतोडणीसाठी गेलेले 59 कामगार तालुक्यात परतले आहेत. त्यांना केसापुरी कॅम्प वसाहतीजवळ शासकीय मुलींच्या वस्तीगृहात 22 एप्रिल रोजी क्वारंटाईन करण्यात आले. यातील अनेकजण दारू पिण्यासाठी हॉस्टेलच्या जवळपास 10 फुट उंच कंपाउंडवरून उडया मारून बाहेर जात असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांनी सांगितले. दरम्यान, राजेश अनभुले (रा.वडगाव) याने अशाच प्रकारे बाहेर पडून दारू पिऊन येत आपल्या पत्नीस मारहाण केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी दिली आहे.
10 फुट उंच कंपाउंडवरून उडी मारून क्वारंटाईन केलेले नागरिक बाहेर जात आहेत. यात काही बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण राहील ?
-- सत्यभामा सौंदरमल , सामाजिक कार्यकर्त्या
सदरील घटना शनिवारी झाली होती. त्या व्यक्तीला समज देण्यात आला असुन यापुढे त्याने असा प्रकार केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
-- सुरेश बुधवंत , पोलीस निरीक्षक , माजलगाव शहर