CoronaVirus : बीडकरांना दिलासा; आष्टीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सहा नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 06:50 PM2020-04-10T18:50:19+5:302020-04-10T18:53:01+5:30
पिंपळा गावातील एकास कोरोनाची लागण
बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एका ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीतून उघड झाले आहे. त्याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतू त्याच्या संपर्कात आलेल्या इतर सहा नातेवाईकांना बीड जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करून स्वॅब घेतले होते. या सर्वांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पिंपळा येथील दोघे जण जमातसाठी अहमदनगरला गेले होते. यावेळी यातील ६३ वर्षीय व्यक्ती ही त्याच्या बहिणीकडे वास्तव्यास होती. याच जमातमध्ये इतर ठिकाणचे लोकही होते. यातूनच त्यांच्या मेव्हण्याला व बहिणीला कोरोनाची लागण झाली. दोघांनाही रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही व्यक्ती आष्टी तालुक्यातील पिंपळा या मुळ गावी आली. ते दोघे बीडला आल्याचे समजताच बीड प्रशासनाने त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. यातील एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला तर दुसºयाचा निगेटिव्ह आला होता. एकजण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
दरम्यान, दोघांच्याही संपर्कात असलेल्या दोघांच्याही पत्नी, मुलगा व इतर नातेवाईक अशा सहा लोकांना लोकांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्या सगळ्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. त्यात सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली. यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एका दिवसांत २१०३ घरांचे केले सर्वेक्षण
कोरोनाग्रस्त रुग्ण आढळताच पिंपळ्यासह परिसरातील सात कि.मी.चा परिसर बंद करण्यात आला आहे. जवळपास आठ गावे लॉक केली असून सर्व प्रशासन तेथे तळ ठोकून आहे. तसेच एका दिवसांत २४ पथकांद्वारे २१०३ घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात ९ हजार ४७६ लोकांची तपासणी केली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
स्वॅब औरंगाबादला गेल्याने अहवालास उशिर
आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. परंतु आता यापुढे बीडसाठी औरंगाबादची प्रयोगशाळा असणार आहे. पहिल्यांदाच इकडे स्वॅब गेल्याने उशिर झाला आहे. आता यापुढे लवकरात लवकर अहवाल प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे.