coronavirus : बीडकरांना दिलासा; खाजगी डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह ११६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:48 PM2020-05-29T22:48:45+5:302020-05-29T22:49:54+5:30
पाटोदा तालुक्यातील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील नागरिकांचे अहवाल
बीड : पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बीड शहरातील खाजगी डॉक्टर, कर्मचारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी पाठविलेल्या ११८ पैकी ११८ स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २ प्रलंबित आहेत. या निगेटिव्ह अहवालांमुळे बीडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कारेगाव येथील रुग्ण बीडमधील दोन खाजगी रुग्णालये आणि एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तपासणीसाठी गेला होता. त्यामुळे त्याचा डॉक्टर, कर्मचाºयांशी संपर्क आला होता. तसेच एका रुग्णालयात तो चार दिवस अॅडमिट होता. त्यामुळे अॅडमिट असलेल्या इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबतही अप्रत्यक्ष, प्रत्यक्षरित्या संपर्क आला होता. आरोग्य विभागाने सर्वांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून शुक्रवारी त्यांचे स्वॅब घेतले. जिल्ह्यातून ११८ स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. पैकी ११६ निगेटिव्ह आले असून २ प्रलंबित आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या ६१ आहे. पैकी पाच कोरोनामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे. ६ रुग्ण पुण्याला उपचारासाठी गेल्याने बीडमध्ये ४९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.