CoronaVirus : परभणीतील कोरोना पॉझिटिव्ह तरुण माजलगावातून गेल्याची अफवा; नागरिक,प्रशासनाची उडाली धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:30 PM2020-04-18T17:30:17+5:302020-04-18T17:34:19+5:30
प्रशासनाच्या चौकशीतून यातील खोडसाळपणा बाहेर आला असून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : परभणी जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांची परभणी मनपा कडुन चौकशी होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील नामसाधर्म्य व अर्धवट माहितीचा आधार घेत हा व्हिडीओ शहराच्या जवळील चिंचगव्हाण येथील असून तो पॉझिटिव्ह रुग्ण येथे येऊन गेल्याची अफवा पसरल्याने माजलगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. यामुळे शुक्रवारी दुपारपासुन नागरिक आणि प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. प्रशासनाच्या चौकशीतून यातील खोडसाळपणा बाहेर आला असून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्याहून आलेला परभणी येथील कोरोना पॉझिटिव्ह माजलगाव-पाथरी मार्गे परभणीला गेला. जाताना तो माजलगावला मुक्कामी थांबला होता. याप्रकरणी शहरालगतच्या चिंचगव्हाण या पुनर्वसीत भागात चौकशी करण्यात आली अशी अफवा एका व्हिडीओसह शुक्रवारी दुपारपासून पसरल्याने एकच खळबळ उडाली.
ही अफवा लागलीच शहरभर पसरल्याने पत्रकार व प्रशासन यांना फोनकरून नागरिकांनी विचारणा सुरू झाली. लगोलग आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासनाचा ताफा चिंचगव्हाणमध्ये दाखल झाला. व्हिडीओतील ठिकाण आणि व्यक्तींचा शोध घेण्यात आला मात्र यात कसलेच तथ्य नसल्याचे आढळून आले नाही. यामुळे शासकीय यंत्रणेसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
ही आहे व्हायरल व्हिडीओची सत्यता
या अफवांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता परभणी मनपा पदाधिकारी कडून वस्तुनिष्ठ माहिती न देता व्हायरल करण्यात आलेला व्हिडीओ मुळाशी असल्याचे दिसून आले. परभणी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तो रुग्ण परभणी एमआयडीसी च्या मागील बाजूस असलेल्या त्याच्या मेव्हण्याकडे मुक्कामला असल्याची मनपा प्रशासनास माहीती मिळाली. यावरून मनपाची टीम त्या ठिकाणी जाऊन संबंधीत तरुणाची चौकशी करत असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसते. व्हिडिओच्या शेवटी मनपातील पदाधिकारी लोकांना आवाहन करत असल्याचे चित्रीकरण आहे. मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कोठेही परभणी असा उल्लेख नाही. याचाच फायदा उचलत हा व्हिडीओ माजलगाव शहरापासून 1 कि.मी. अंतरावर असलेल्या पुनर्वसित चिंचगव्हाण येथील असून येथील एका व्यक्तीकडे तो रूग्ण येवुन गेला होता अशी अफवा पसरली.
पोलीस यंत्रणा दक्ष
आरोग्य प्रशासनाच्या मदतीने चिंचगव्हाणला भेटून पूर्ण चौकशी केली असता परभणीचा रुग्ण माजलगाव मध्ये थांबल्याची कोणती ही माहिती मिळाली नाही. ती केवळ एक अफवा होती तरीही पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन याबाबत पूर्ण काळजी घेत आहे, असे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी सांगितले.