coronavirus : सुरक्षिततेचा प्रश्न; कोरोनाबाधित कैद्यांवर कारागृहामध्येच उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:18 PM2020-08-25T17:18:32+5:302020-08-25T17:24:18+5:30
एकाच रात्री ५९ कैदी पॉझिटिव्ह आल्याने कारागृह व पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती.
बीड : जिल्हा कारागृहातील तब्बल ५९ कैदी एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. अगोदर दोन कैद्यांनी पलायन केल्याने आणि सुरक्षेअभावी या सर्वांवर जिल्हा कारागृहातच उपचार केले जात आहेत. या कैद्यांसह १२८ जणांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. आता एकूण रुग्णसंख्या ४ हजार ७७ झाली आहे.
जिल्हा कारागृहातील आठ कैद्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे होती. त्यामुळे त्यांची अँटिजन टेस्ट केली. यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर कारागृहातील सर्वच २३४ कैद्यांची टेस्ट केली. यात २२४ पुरूष व १० महिलां कैद्यांचा समावेश होता. यात तब्बल ५९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कैदी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ठेवायचे कोठे आणि उपचार करायचे कोठे? असा प्रश्न प्रशासन व आरोग्य विभागासमोर होता. अखेर सुरक्षाअभावी या सर्वांना कारागृहातच स्वतंत्र दोन बरॅक करून उपचार केले जात आहेत. रविवारचे ५९ व शनिवारचा एक अशा ६० पैकी ५८ कैदी कारागृहात असून दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कारागृहातील कैद्यांवर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी
एकाच रात्री ५९ कैदी पॉझिटिव्ह आल्याने कारागृह व पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. याची माहिती आरोग्य विभागाला देताच दोन वैद्यकीय अधिकारी व पथकामार्फत त्यांची रात्रीच जाऊन तपासणी करण्यात आली. त्यांना औषधोपचार देण्यात आले.
औषधोपचार दिले जात आहेत
कारागृहातील २३४ कैद्यांची तपासणी केली होती. पैकी ५९ पॉझिटिव्ह आले. याची माहिती जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला देण्यात आली. लक्षणे नसल्याने त्यांच्या सूचनेनुसार या सर्वांना कारागृहातच ठेवून उपचार केले जात आहेत. त्यांची योग्य ती काळजी घेऊन औषधोपचार दिले जात आहेत.
- एम.एस.पवार, अधीक्षक, जिल्हा कारागृह बीड