CoronaVirus : लॉकडाऊनमुळे सलूनच आले घरी; व्यवसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतोय मात्र धोका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 06:09 PM2020-04-10T18:09:13+5:302020-04-10T18:10:16+5:30
छोट्यामोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : लॉकडाऊनमुळे अनेक छोट्यामोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच न्हावी समाजातील सलून व्यावसायिकांना हा प्रश्न मोठ्याप्रमाणात भेडसावत असल्याने त्यांनी आता घरोघरी जाऊन सेवा द्यायला सुरुवात केली आहे. मात्र, घरपोच सेवा देताना सुरक्षेची काळजी नाही घेतल्यास कोरोनाचा धोका वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
कोरानोचा प्रादुर्भाव एकमेकाच्या संपर्कातून मोठ्याप्रमाणात होतो. सलूनच्या माध्यमातून याचा फैलाव अधिक होण्याच्या संशयाने ही दुकाने महिनाभरापासून बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र यामुळे हातावर पोट असलेल्या न्हावी समाजातील व्यावसायिकांवर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे लॉक डाऊनला पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेल्याने अनेक नागरिकांच्या कटिंग, दाढी वाढल्याने समस्या निर्माण झाली होती. बाहेर संचारबंदी, ठरावीक वेळेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु राहत असल्याने कटिंग, दाढीचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर पर्याय म्हणून नागरिकांनी ठरावीक न्हाव्यांना घरी बोलवायला सुरुवात केल्याने नागरिक, मुलांच्या वाढलेल्या केसांवर कात्री फिरायला लागली. न्हावी घरी येऊन घरातील लहान मुलांसह मोठ्यांच्या कटिंग, दाढीचे सोपस्कार पूर्ण करीत आहेत.
धोका मात्र कायम
न्हावी समाजाकडून सलूनची सेवा घरपोच होत असली तरी, कोरोनाबाबतची योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कटिंग, दाढीचे साहित्य काळजीपूर्वक निर्जंतुक नाही केल्यास कोरोनाचा धोका कायम राहत असल्याने विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.