CoronaVirus : धक्कादायक ! ८०० किमी चा प्रवास; पण साधे हटकले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 07:18 PM2020-04-15T19:18:54+5:302020-04-15T19:20:09+5:30
बीड, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी मार्गावर दुचाकीवरून प्रवास
बीड : सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. तसेच विनाकारण फिरण्यास बंदी आहे. पोलिसांकडून गस्त घातल्याचा दावा केला जात आहे. परंतु मागील तीन दिवसांत तब्बल ८०० किलो मिटरचा प्रवास केला तरी अंमळनेर वगळता कोणीच साधी हटकण्याची तसदीही घेतली नाही. हा प्रवास बीड, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी मार्गावरून केला होता. पोलिसांनी याकडे सकारात्मक पाहून यंत्रणेला सुचना करण्याची गरज आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. जिल्ह्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. अत्यावश्यक सेवेला पास देण्यात आलेले आहेत. याच पासच्या अनुषंगाने जिल्ह्यात तीन दिवसांत ८०० किलो मिटरच्या अंतरावर दुचाकीवरून प्रवास केला. परंतु कोणीही हटकले नाही. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे मात्र, काही पोलिसांनी रितसर चौकशी करून आणि पास पाहुन पुढील प्रवासाला परवानगी दिली. त्यानंतर बीड, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, केज, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव, पाटोदा, आष्टी या तालुक्यांतून प्रवास केला. पण कोणीच हटकले नाही. त्यामुळे बाहेरून येणारे लोक किंवा दुचाकीवरून फिरणाऱ्या लोकांकडे यंत्रणा दुर्लक्ष करतेय काय? याचा दुर्लक्षाचा गैरफायदा घेऊन बाहेरचे लोक छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, बाजू समजून घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी सपोनि विलास हजारे यांना संपर्क केला. पोलीस अधीक्षकांशी बोलून सांगतो, असे ते म्हणाले. उशिरापर्यंत त्यांनी बाजू सांगितली नाही.
पोलिसांच्या चौकाचौकात बैठका
या प्रवासादरम्यान, शहरांतील काही मुख्य चौकांमध्ये बंदोबस्तावर नियूक्त केलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी सावलीत आराम करताना दिसले. त्यांच्यासमोरून अनेक वाहने भरधाव वेगाने जात होते. चौकशी करण्यास ते कानाडोळा करीत होते. हाच कानाडोळा बीडकरांना त्रासदायक ठरू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्यांनी तत्पर कर्तव्य बजावण्याची आवश्यक आहे.
असा झाला प्रवास..
शनिवारी बीड-वडवणी-धारूर-आडसमार्गे अंबाजोगाई नंतर अंबाजोगाईहून लोखंडीसावरगाव - केज- नेकनूर - मांजरसुंबामार्गे बीड. रविवारी बीड - वडवणी व तालुक्यातील ग्रामीण भाग. पुन्हा त्याच मार्गाने बीडला परत. सोमवारी बीड- अंमळनेर- धामणगाव - कडा - धानोरा - कडा - आष्टी - डोईठाण - अंमळनेरमार्गे पुन्हा बीड परत. त्याच दिवशी बीड - गढी - माजलगाव आणि त्याच मार्गाने परत. असा प्रवास दुचाकीवरून (रितसर पास घेऊन) करण्यात आला. हा प्रवास करताना नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले होते.