coronavirus : धक्कादायक ! सार्वजनिक स्मशानभूमीतील कोरोनाबाधिताचा अंत्यविधी नागरिकांनी रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:58 AM2020-07-23T11:58:23+5:302020-07-23T12:11:18+5:30
बोरुळा स्मशानभूमीत कोरोना मयतांचे अंत्यसंस्कार नको, पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
अंबाजोगाई : शहरातील बोरुळा तलाव स्मशानभूमीत आज संतप्त नागरिकांनी कोरोनाबाधित व्यक्तीचा अंत्यविधी रोखला आहे. कोरोना मयतांसाठी प्रशासनाने स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अंबाजोगाईत नागरी वस्तीत असलेली बोरूळ स्मशानभुमी सार्वजनिक असून शहरातील ७० टक्के अंत्यविधी या ठिकाणी होतात. दहाव्याचे कार्यक्रम देखील नियमित सुरु असतात. येथील तलावावर कपडे धुण्यासाठी आजूबाजच्या महिलांची सतत वर्दळ असते. तसेच, हे ठिकाण स्वाराती रूग्णालयापासून ३ किमी अंतरावर असून या ठिकाणी मृतदेह आणण्यासाठी गावातून वर्दळीच्या रस्त्याने यावे लागते. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी कोरोना मयत रुग्णांवर अंत्यसंस्कार करू नयेत अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीच केली होती. त्यानंतरही गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शहरातील व्यक्तीवर बोरूळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरु झाली. याला विरोध करत उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, सारंग पुजारी, अमोल लोमटे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष लोमटे, बाला पाथरकर, अशोक जेधे आणि इतर नागरिकांनी स्मशानभूमीत जमा होत अंत्यसंस्कार रोखले. बोरुळा स्मशानभूमीत नियमित असे अंत्यविधी होऊ लागले तर त्यातून प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी कोरोना मयतांचे अंत्यविधी करू नयेत, त्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
▪ स्वाराती रुग्णालय परिसरात व्यवस्था करा :
स्वाराती रूग्णालयाच्या शवगृहाजवळच मोठे खुले मैदान आहे. या ठिकाणी तात्पुरते शेड उभा करून कोरोना मयतांचे अंत्यविधी तिथेच करावेत अशी मागणी यापूर्वीच नगरसेवक शेख रहीम, सारंग पुजारी ॲड. संतोष लोमटे यांनी मुख्याधिकार्यांकडे केली होती. उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे यांनी देखील स्वाराती रुग्णालय परिसरात तात्पुरती स्मशानभूमी उभारण्याचा मुद्दा सभागृहात मांडला होता.
▪ पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु :
“कोरोना प्रभावित मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच स्वाराती रुग्णालय परिसरात अंत्यविधीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात येईल. सर्व नियमांचे काटेकोर पालन करून अंत्यविधी होतील.”
-शोभा जाधव, उपविभागीय कार्यकारी अधिकारी, अंबाजोगाई.