CoronaVirus : धक्कादायक ! कोरोनाग्रस्ताचे गावात आहे किराणा दुकान; पिंपळा गावासह परिसर अनिश्चित काळासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 12:56 PM2020-04-08T12:56:17+5:302020-04-08T12:59:05+5:30
कोरोना विषाणू संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याने पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित
- अविनाश कदम
आष्टी : तालुक्यातील पिंपळा येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे गावात किराणा दुकान आहे. यामुळे त्याचा रोज अनेकांशी संपर्क येत असल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. मात्र किराणा दुकान दोन महिन्यांपासून बंद असल्याने गावावरचे मोठे संकट काहीप्रमाणात टळल्याचे दिलासादायक चित्र आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फौजदारी दंड संहिता 1973 कलम 144 नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर सुंबेवाडी , धनगरवाडी , काकडवाडी , ढोबळ सांगवी व खरड गव्हाण हा परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित केला आहे .
तालुक्यातील पिंपळा येथील दोन व्यक्ती अहमदनगर येथील एका कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने त्यांना अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवून होम कॉरंटाईन करण्यात आले. त्यातील एक किराणा दुकानदाराचा दि ७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फौजदारी दंड संहिता १९७३ कलम १४४ नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसरामध्ये सुंबेवाडी , धनगरवाडी , काकडवाडी , ठोंबळ सांगवी व खरडगव्हाण हा परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित केला आहे. यासोबतच पुढील चार किलोमीटर चा परिसर लोणी , नांदूर , सोलापूरवाडी , खुंटेफळ, कोयाळ हे गावे बफर झोन (buffer zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे . वरील सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित काळासाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येत असून संचारबंदी लागू केली आहे. पिंपळा परिसरातील सर्व रस्त्यांवर चर खोदून सीमा सील करण्यात आले आहेत. पिंपळा येथे तहसीलदार, बीडीओ, पोलीस, वैद्यकीय पथक तळ ठोकून आहेत.
किराणा दुकान बंद असल्याने संकट टळले
कोरोना ग्रस्ताचे वय ६३ असून त्याचे दोन महिन्यांपासून किराणा दुकान बंद होते. यामुळे
पुढचा अनर्थ टळला आहे. कोरोना बाधीताची पत्नी व मुलगा व अन्य दोन व्यक्तींना अगोदर आष्टीत ठेवण्यात आले होते. त्यांनंतर त्यांना बीड येथे नेऊन अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व मित्रपरिवाराचा शोध घेण्यात येत असून आतापर्यंत सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती आहे.