coronavirus : धक्कादायक ! बीडमध्ये निवासी उपजिल्हाधिकार्यांची इमारत प्रतिबंधित क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:08 PM2020-07-21T21:08:40+5:302020-07-21T21:11:11+5:30
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासह त्या इमारतीतील सर्व विभाग बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
बीड : बीड जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपायाची पत्नी पॉझिटिव्ह आल्यामुळे पूर्ण इमारत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रतिबंधित क्षेत्र केले आहे. याबाबतच्या सूचना त्यांनी सोमवारी दिल्या आहेत. त्यामुळे दुपारपासून कार्यालयातील सर्व विभाग अचानक बंद ठेवावे लागले. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपायाची पत्नी परजिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याच्या संशयावरुन खबरदारीचा उपाय म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासह त्या इमारतीतील सर्व विभाग बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. त्यानंतर अचानक विभाग बंद केल्यामुळे कार्यालयात येणार्या अभ्यागतांची गैरसोय झाली. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील शिपायाचा कोरोना चाचणीसाठी नमुना प्रयोगशाळेकडे पाठविला आहे. सोमवारी उशिरा किंवा 22 जुलै रोजी प्राप्त होणार्या अहवालावर निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य विभाग खुले करणार की बंद ठेवणार हा निर्णय होणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरुन प्रतिबंधित क्षेत्र करण्याची कार्यवाही करण्यात आली. संपर्कातील व्यक्तीचा कोरोना चाचणीसाठी नमुना पाठविला आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील आवश्यक ती कार्यवाही करु.
-मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड