CoronaVirus : साहेब, १५ दिवस बसून होतो; आता २८ दिवस वेगळे बसल्यावर खायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:18 PM2020-04-22T12:18:19+5:302020-04-22T12:29:16+5:30

ग्राऊंड रिपोर्ट - सौताडा चेकपोस्ट : ऊसतोड कामगारांच्या व्यथा; बीड जिल्ह्यात प्रवेश करताच हातावर क्वारंटाईनचा बसला शिक्का

CoronaVirus: Sir, I sit for 15 days; What to eat now after 28 days apart? | CoronaVirus : साहेब, १५ दिवस बसून होतो; आता २८ दिवस वेगळे बसल्यावर खायचे काय?

CoronaVirus : साहेब, १५ दिवस बसून होतो; आता २८ दिवस वेगळे बसल्यावर खायचे काय?

Next
ठळक मुद्देसौताडा चेक पोस्टवर ऊसतोड मजूरांनी तपासणीसाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी पथकाकडून चेक पोस्टचा आढावा घेतलामजूरांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारताना कर्मचारी.

- सोमनाथ खताळ
बीड : कारखान्याचा पट्टा पडला. पंधरा दिवस झालं कोपीतच बसून आहोत. जवळचे नगदी पैसे संपले. कसेबसे घरी येत आहोत. आता आणखी २८ दिवस वेगळंच बसा म्हणून हातावर शिक्का मारला जातोय. असे म्हणल्यावर खायचे काय? लेकरां बाळांचं पोट कसं भरायचं? असा सवाल उसतोड कामगार उपस्थित करीत आहेत. पाटोदा तालुक्यातील सौताडा चेक पोस्टवरून जिल्ह्यात प्रवेश करणा-या कामगारांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी ते गहिवरून गेले होते. पुढच्या २८ दिवसांत निर्माण होणारे प्रश्न, त्यांच्या चेहऱ्य्यावर स्पष्ट दिसत होते. 

कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आलेले आहेत. परंतू जिल्ह्यातील हजारो ऊसतोड मजूर बाहेर जिल्ह्यात अडकून पडले होते. कारखाना बंद झाला तरी सीमा बंदीमुळे त्यांना आहे त्याच ठिकाणी रहावे लागले होते. अखेर दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने या कामगारांना वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक करीत जिल्ह्यात प्रवेश देण्यास सांगितले. यासाठी बीड जिल्ह्यात १९ ठिकाणी चेक पोस्ट तयार केल्या आहेत. यातीलच पाटोदा तालुक्यातील सौताडा चेक पोस्टवर ‘लोकमत’ने भेट दिली. यावेळी सांगली, सातारा व इतर जिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करू इच्छिना-या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातील शेकडो मजूर आरोग्य तपासणीसाठी रांगा लावत होते. डोक्यावर उन घेत प्रत्येक कामगार तपासणी करून घेताना दिसले. प्रत्येकाला घरी जाण्याची ओढ लागली होती. तपासणी होताच तात्काळ वाहनात बसून ते गावच्या दिशेने जात होते. त्यांच्या चेह-यावरील हास्य खुप काही सांगत होते. 

नोंदणी करून तपासणी करा - डीएचओ
जिल्ह्यात येणा-या प्रत्येक कामगारांची आणि वाहनांची नोंदणी व्यवस्थित करून तपासणी करा. कोरोनाची लक्षणे जाणवली तर तात्काळ कळवा, अशा सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिल्या. तसेच थर्मल गन व इतर औषध साठ्याचा आढावाही डॉ.पवार यांनी घेतला. यावेळी डॉ.चैताली भोंडवे यांनी चेक पोस्टवरील सर्व माहिती दिली.

अशी सुरू होती प्रक्रिया
वाहन येताच ते पोलिसांनी अडविले. मजुरांना खाली उतरवून रांगेत उभा केले. नंतर एका शिक्षकांच्या टिमने नावांची खातरजमा केली. पुढे डॉक्टरांनी तपासणी केली. नंतर हातावर शिक्के मारून पुन्हा वाहनांच्या दिशेने परत पाठविले. एका गाडीत किमान छोटी-मोठी ३० ते ४० लोक असतात. यांची तपासणी करण्यासाठी किमान एक तास लागतो. 

नियोजनाचा थोडा अभाव; सुधारणे आवश्यक
आलेल्या मजूरांची रांग लावण्याचे काम आरोग्य कर्मचारी, शिक्षकच करीत होते. पोलिसांनी हे काम केल्यास अधिक फरक पडतो, शिवाय सोशल डिस्टन्सही राहतो. येथे नियूक्त केलेले अधिकारी, कर्मचारी उत्कृष्ट कर्तव्य बजावत आहेत, परंतु आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. सोबत स्वता:चीही काळजी घ्यावी. 

काही पण करा, फक्त घरी जाऊद्या
ऊसतोड मजूरांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. काम संपल्यानंतरही त्यांना विनाकारण १५ दिवस अडकून पडावे लागले. शिवाय रोजगारही बुडाला. आता ते वैतागले होते. आमची तपासणी करा, नाहीतर आणखी काही करा. फक्त आम्हाला आमच्या घरी सुखरूप जाऊद्या, असे भावनिक उद्गार डोंगरकिन्ही येथे अजिनाथ गाडवे यांनी काढले. तर अंतापूरचे महादेव गाडे म्हणतात, येताना प्रत्येकजणाला तोंड दिले. कोरोना बोरोना आम्हाला नाही समजत. आम्हाला आमचे काम करू द्या आणि पोट भरू द्या. 

मजूरांना पाणी, शौचालयाची व्यवस्था हवी
शेकडो किलो मिटर प्रवास करून येणाऱ्या मजूरांना चेक पोस्टवर आल्यावर पाण्याची व्यवस्था व्हायला हवी. तसेच शौचालयाची व्यवस्था नसल्याने उघड्यावर जावे लागत आहे. यात महिलांची तर अधिक कुचंबणा होत आहे. प्रशासनाने या मुद्यांकडेही लक्ष देऊन सोय करावी. तसेच रांग लावायच्या ठिकाणी सावलीची व्यवस्था करावी. तळपत्या उन्हात एखादा व्यक्ती उभा राहून आजारी पडू शकतो. रांगेत उभा राहणा-यांमध्ये चिमुकल्यांसह वृद्धांचाही समावेश असतो. 

शिक्का पाहून घाबरला चिमुकला
क्वारंटाईन करण्यासाठी शिक्षक लोक मजूरांच्या हातावर शिक्का मारत होते. आपल्या आईच्या हातावर शिक्का मारल्याचे दिसतच चिमुकला घाबरला. नंतर त्याचाही हात पुढे केला. परंतू तो घाबरून रडू लागलो. आईने समजावले, पण उपयोग झाला नाही. त्याने रडून रडून स्वता:ला खुप त्रास करून घेतला. असे अनेक किस्से चेक पोस्टवर पहावयास मिळत होते. ते पाहून उपस्थित अधिकारी, कर्मचारी भावनिक झाल्याचे दिसले. 

Web Title: CoronaVirus: Sir, I sit for 15 days; What to eat now after 28 days apart?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.