coronavirus: साहेब ! कोरोनाने नव्हे, तर पीपीई कीटने मरू..., डॉक्टर, कर्मचारी वैतागलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 06:28 AM2021-03-29T06:28:31+5:302021-03-29T06:29:00+5:30
coronavirus in beed : कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीट आहेत. परंतु, सध्या याच कीट त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू पाहत आहेत.
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीट आहेत. परंतु, सध्या याच कीट त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू पाहत आहेत. खराब कीटमुळे हे सर्व लोक वैतागले आहेत. कोरोनाने नव्हे, तर कीटमुळेच मरू, असा सूर त्यांच्यातून निघत आहे. सहा तासांच्या ड्यूटीत उघड्या अंगाला चिरा पडतात तर बुटात ग्लासभर घाम साचतो. कोरोना वॉर्डमधील हे वास्तव मांडताना त्यांच्या अंगावर शहारे उमटले. ( Sir! Not by corona, but by PPE insects ..., doctors, staff annoyed)
जिल्हा रुग्णालयासह इतर सर्वच कोरोना रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी पीपीई कीटचा (पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट) वापर करतात. सुरुवातीच्या काळात या कीट दर्जेदार असल्याने त्रास होत नव्हता. परंतु, सध्या राज्यस्तरावरुन पुरविल्या जाणाऱ्या कीट अतिशय खराब आहेत.
अंगात घालताच पुढील पाचच मिनिटांत व्यक्ती घामाघूम होतो. प्लास्टिक स्वरुपाच्या या कीट सहा तास अंगात ठेवून कर्तव्य बजावताना सगळेच वैतागत आहेत. कसलीही हवा लागत नसल्याने अंगातून घामाच्या धारा निघत असून बुटात तर ग्लासभर घाम साचते. त्यामुळे सध्याच्या कीटला सर्वांचीच नकारघंटा असल्याचे दिसत आहे.
याबाबत कारवाईच्या भीतीपोटी कर्मचाऱ्यांनी नाव छापण्यास मनाई केली, परंतु समस्या मांडताना त्यांच्या अंगावर शहारे येत होते. त्यामुळे या कीट बदलून दर्जेदार कीट द्याव्यात, अशी मागणी कक्षसेवक ते डॉक्टर या सर्वांमधून हाेत आहे.
कीट नको, मास्क अन् ग्लोव्हज बस्स झाले...
n एक तरुण ब्रदर रात्री ८ वाजेच्या सुमारास ड्यूटीस वॉर्डमध्ये आले. रुग्णांची माहिती घेईपर्यंतच ते घामाघूम झाले. केवळ पाच मिनिटांतच त्यांनी ती कीट काढून बाजूला फेकली.
n त्यानंतर पुढील सर्व कर्तव्य त्यांनी कीटविनाच बजावले. केवळ त्रास होत असल्याने कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे जीव धोक्यात घालावा लागत आहे. कीटबद्दल विचारताच त्यांनी कीट नको रे बाबा, असे सांगितले.
n मास्क आणि ग्लोव्हजच खूप झाले. या कीटपेक्षा कोरोना झालेला परवडतो, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. एका मावशीनेही अशीच प्रतिक्रिया दिली.
काहींनी तर कीट घालणेच सोडले
n कीटमुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून अनेक डॉक्टर, परिचारिका, ब्रदर, कक्षसेवक यांनी कीट घालणेच सोडले आहे.
n केवळ मास्क व ग्लोजचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.
n या सर्व परिस्थितीवरून सर्वच लोक सध्या कीटला वैतागल्याचे दिसते. त्या बदलण्यासाठी मागणी जोर धरत आहे.
सध्याच्या कीट राज्य स्तरावरूनच आलेल्या आहेत. त्या बदलण्याची तयारी सुरू आहे. लवकरच पहिल्याप्रमाणे कीट येणार आहेत. त्याचा पाठपुरावा सुरु आहे.
- डॉ. सूर्यकांत गित्ते,
जिल्हा शल्यचिकित्सक, बीड