CoronaVirus : बीडकरांची धाकधुक वाढली; आष्टीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:35 PM2020-04-09T16:35:52+5:302020-04-09T16:36:40+5:30
सहा नातेवाईकांना बीड जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करून स्वॅब घेतले होते.
बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एका ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीतून उघड झाले आहे. त्याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतू त्याच्या संपर्कात आलेल्या इतर सहा नातेवाईकांना बीड जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करून स्वॅब घेतले होते. या सर्वांचे अहवाल गुरूवारी दुपारपर्यंत आलेले नव्हते. त्यांचे अहवाल काय येतात? याबाबत बीडकरांमध्ये धाकधुक वाढली आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्हच यावेत, यासाठी बीडकर प्रार्थना करू लागले आहेत.
पिंपळा येथील दोघे जण जमातसाठी अहमदनगरला गेले होते. यावेळी यातील ६३ वर्षीय व्यक्ती ही त्याच्या बहिणीकडे वास्तव्यास होती. याच जमातमध्ये इतर ठिकाणचे लोकही होते. यातूनच त्यांच्या मेव्हण्याला व बहिणीला कोरोनाची लागण झाली. दोघांनाही रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही व्यक्ती आष्टी तालुक्यातील पिंपळा या मुळ गावी आली. ते दोघे बीडला आल्याचे समजताच बीड प्रशासनाने त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. यातील एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला तर दुस-याचा निगेटिव्ह आला होता. एकजण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
दरम्यान, दोघांच्याही संपर्कात असलेल्या दोघांच्याही पत्नी, मुलगा व इतर नातेवाईक अशा सहा लोकांना लोकांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्या सगळ्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविलेले आहेत. आता अहवाल पॉजिटिव्ह येतो, की निगेटिव्ह, याबाबत बीडकरांमध्ये धाकधुक वाढली आहे. सर्वांना अहवाल येण्याची प्रतिक्षा असल्याचे दिसते.