CoronaVirus : कडक सॅल्युट ! जीव धोक्यात घालून ‘खाकी’ राबवतेय ‘ऑपरेशन कोरोना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:32 PM2020-04-06T17:32:30+5:302020-04-06T17:35:35+5:30
शहरी व ग्रामीण भागात १० पोलिस व्हॅन घालतात गस्त
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई - कोरोना विषाणूंचा संसर्ग सर्वत्र वाढत असतांनाही आपला जीव धोक्यात घालून सामान्य माणूस सुरक्षित रहावा यासाठी पोलिस प्रशासन (खाकी) कोरोना आॅपरेशन प्रभावीपणे राबवित आहे. ऊन,वारा, पाऊस व प्रादुर्भावाचा विचार न करता पोलिसांचे काम अखंडितपणे सुरूच आहे. सर्वजण आपआपल्या कुटुंबियांसमवेत घरात सुरक्षित असतांना पोलिस बांधव मात्र, जनतेच्या संरक्षणासाठी रस्त्यावर तळ ठोकून आहेत.
अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. अंबाजोगाई शहर व अंबाजोगाई तालुका विस्तीर्ण आहेत. तालुक्यात बर्दापूर व देवळा या दोन ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा बंद होतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी तीन अधिकारी,सहा कर्मचारी व चार होमगार्ड नाकाबंदीसाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्याच्या या सीमा कडेकोट बंदोबस्तात ठेवून लक्ष केंद्रित केले जात आहे.
अंबाजोगाई शहरात ४ पोलिस व्हॅन गस्त घालण्याचे काम करत आहे. शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने १५ पॉईंट लावण्यात आले आहेत.या सर्वच ठिकाणी पोलिस बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव संसार्गामुळे वाढतो. यासाठी गर्दी पांगविणे, बाहेर फिरण्यासाठी मज्जाव करणे यासाठी पोलिस गल्लीबोळातून नागिरकांना हुसकावून लावत आहेत. ज्यांना सांगूनही कळत नाही. अशांना पोलिस प्रसादही सुरू आहे. अंबाजोगाई शहरात राज्य राखीव दलाची एक तुकडी जालना येथून पाचारण करण्यात आली आहे. या तुकडीतील ३० जवान बंदोबस्तासाठी चौकाचौकात तैनात ठेवण्यात आले आहेत.
ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने पाच पोलिस व्हॅन बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. नाकाबंदी गावोगावी जाऊन होणारी पेट्रोलिंग,यासाठी अधिकारी व कर्मचारी सज्ज आहेत. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही लोक रस्त्यावर येऊ नयेत यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर घाटनांदूर येथे असणाऱ्या पोलिस चौकीच्या माध्यमातून घाटनांदूर व परिसरात तर बर्दापूर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत बर्दापूर व परिसरात बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. अंबाजोगाई तालुक्यात शहर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत ३६ कर्मचारी पाच अधिकारी १० होमगार्ड व एक राज्य राखीव दलाची तुकडी तैनात आहे. तर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या अंतर्गत पाच अधिकारी, ४६ कर्मचारी व ४ होमगार्ड बंदोबस्ताचे काम पाहत आहेत. सेवेत असणारे बहुतांश पोलिस व अधिकारी गेल्या तीन आठवडयांपासून रस्त्यावरच तळ ठोकून आहेत. ही सर्व यंत्रणा सतर्क ेठेवण्यासाठी अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक राहुल धस, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत सज्ज आहेत.
पोलिसांच्या आरोग्या बाबतही दक्षता
कोरोना विषाणूंचा संसर्ग पोलिस बांधवांना होऊ नये, यासाठी त्यांना विविध आरोग्यविषयक काळजी घेण्यासाबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच समोरच्या व्यक्तीशी किती अंतरावरून बोलावे. प्रत्यक्ष व्यक्तीशी संपर्क न करता अंतरावरूनच बोलल्यास संसर्ग टाळता येतो. अशा अनेक बाबींची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सेवेत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना घरपोच जीवनावश्यक वस्तू कशा उपलब्ध होतील यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी लोकमतशी बोलतांना दिली.