coronavirus संशयितांची सीमारेषेवरच तपासणी; विदेशासह पुणे, मंबईहून येणाऱ्यांवर बीडच्या आरोग्य पथकाचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 01:00 PM2020-03-20T13:00:47+5:302020-03-20T13:09:04+5:30
आरोग्य पथकांसह पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.
बीड : १२ देशांसह कोरोना बाधीत नागपूर, पुणे, मुंबई शहरातून आलेल्या प्रवाशांची बीड जिल्ह्यात एन्ट्री करण्यापूर्वीच सिमारेषेवर तपासणी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात १४ चेक पोस्ट तयार केल्या आहेत. तसेच प्रत्येक तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष पथके नियूक्त केले आहेत.
चीन, इटली, इरान, दक्षिण कोरीया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, संयुक्त अरब एमिरेटस (युएई), कतार, ओमान, कुवेत, यु.एस.ए (अमेरिका) या १२ देशांसह राज्यातील पुणे, मुंबई आणि नागरपूर येथून येणाऱ्या प्रवाशांची चेकपोस्टवर तपासणी केली जात आहे. त्यांची सर्व माहिती संकलीत करण्यासह त्यांना काही लक्षणे आहेत का, याची विचारणा केली जात आहे. लक्षणे असल्याचे समजताच त्यांना जवळच्या आरोग्य संस्थेत नेऊन क्वारंटाईन केले जाणार आहे. चेकपोस्टवर पोलिसांसह आरोग्याचे अधिकारी, कर्मचारी असणार आहेत.
तसेच प्रत्येक तालुक्यात एक आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. आलेल्या प्रत्येक रुग्णांची एका विहित नमुन्यात माहिती संकलीत करून उपचार केले जाणार आहेत. जिल्हा रुग्णालयासह प्रत्येक आरोग्य संस्थेत एक विशेष कक्ष तपासणीसाठी तयार करण्यात आला आहे. हे सर्व करताना आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनीही काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार हे यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत.
सर्वेक्षणासाठी आरबीएसकेचे पथक
एखादी व्यक्ती नजर चुकीने सुटली किंवा आगोदरच शहरात आली असून आणि आता तिला लक्षणे जाणवत असतील तर याचे सर्वेक्षण करण्यासाठी आरबीएसकेच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे पथक नियूक्त केले आहेत. संपूर्ण आरोग्य यंत्रणा सात दिवस २४ तास कर्तव्यावर राहणार असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
येथे आहेत चेक पोस्ट
चौसाळा, पांढरवाडी फाटा, अंभोरा, महार टाकळी - शेवगाव, शहागड पुल, सोनपेठ फाटा, गंगाखेड रोड, गंगामसला, सादोळा, बर्दापुर फाटा, बोरगाव पिंपरी, मालेगाव अशी १४ चेक पोस्ट तयार करण्यात आली आहेत. येथे आरोग्य पथकांसह पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.