CoronaVirus : त्यांना सांगावे...३ मेपर्यंत गावाबाहेरच रहावे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 07:10 PM2020-04-17T19:10:49+5:302020-04-17T19:11:12+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील ७०० सरपंचांसोबत व्हीसीद्वारे संवाद साधला.
बीड : बाहेरील गावचे अथवा गावातील बाहेरगावी असलेल्या व्यक्तीला गावात येऊ देऊ नका, ३ मेपर्यंत तिकडेच थांबायला सांगा अशी सूचना देत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील ७०० सरपंचांसोबत व्हीसीद्वारे संवाद साधला.
कोरोना आपत्ती व्यवस्थापनात सर्वच यंत्रणा कार्यरत आहेत. सोशल डिस्टन्सिंग तसेच गावपातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून शासन व प्रशासनाच्या नियमांचे पालन ग्रामस्थांच्या सहभागातून केले जात आहे. गावचा सरपंच हा महत्वाचा घटक आहे. त्यांच्याशी संपर्क साधून दिलेल्या दशसूत्रीचे पालन करण्याबरोबरच अन्य विषयांवर चर्चा करुन सीईओ कुंभार यांनी मार्गदर्शन केले.
बुधवारी अंबाजोगाई, परळी. माजलगाव, शिरुर, पाटोदा, आष्टी, गेवराई येथील सरपंचांशी संवाद साधण्यात आला. यावेळी सरपंचांच्या अडचणींना उत्तरे देत समाधान केले. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिलेल्या दशसुत्रीचे सर्व ग्रामपंचायतींनी पालन करावे. बाहेरील गावचे अथवा गावातील जे लोक बाहेरगावी आहेत, त्यांना गावात येऊ देऊ नका. ३ मेपर्यंत तिकडेच थांबण्यास सांगावे, असे कुंभार म्हणाले
गावात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर देखरेखीसाठी ग्रामसुरक्षा समिती त्वरित स्थापन करावी. गावभेटीचे रजिस्टर करुन रोज सर्व नोंदी घ्याव्यात. गावातील नागरिकांना मुलभूत गरजा सोडवाव्यात तसेच कुठलाही राजकीय, धार्मिक भेदभाव मनात न ठेवता सर्वांना मदत करण्याची सूचना सीईओ कुंभार यांनी दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी उपस्थित होते.
उपाययोजनेबाबत सीईओंच्या सूचना
गावाला जोडणारे रस्ते, कोणत्याही परिस्थितीत खोदू नयेत किंवा दगड, कोटे टाकून बंद करु नयेत. यामुळे जीवनावश्यक गरजा पोहचविणे तसेच आरोग्य सुविधा पोहचविण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे या दृष्टीने उपाय करण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्या.
दोन दिवस संवादातून संपर्क
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्ह्यातील ७५० तसेच गुरुवारी २५० सरपंचांशी सीईओंनी व्हिसीद्वारे संपर्क साधून एकूण परिस्थितीचा आढावा घेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत माहिती देत सरपंचांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले.