coronavirus : नवीन आरोपींसाठी बीडमध्ये तात्पुरते ‘क्वारंटाईन’ कारागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:15 PM2020-05-11T16:15:41+5:302020-05-11T16:16:14+5:30
स्वतंत्र तात्पूरते कारागृह तयार केले असून सोमवारी याला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोनाच्या अनुषंगाने आता नवीन आरोपींना मध्यवर्ती कारागृहत थेट प्रवेश बंद केला आहे. प्रत्येकाचा कोरोना स्वॅब घेणे बंधनकारक केले आहे. जर स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच त्याला तात्पुरत्या कारागृहात प्रवेश दिला जाणार आहे. १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यावरच १५ व्या दिवशी मध्यवर्ती कारागृहात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र तात्पूरते कारागृह तयार केले असून सोमवारी याला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे.
मुंबई मध्यवर्ती कारागृह आणि सातारा जिल्हा कारागृहातील कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर राज्यात सर्वत्रच काळजी घेण्यात आली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कारागृहातील कैदी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अपर पोलीस महासंचालक व कारागृह महाराष्ट्र राज्य पुणे १ यांनी तात्काळ आदेश काढले. प्रत्येक कारागृह अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तात्पूरत्या कारागृहास जागा देण्यासाठी पत्र देण्यास सांगितले. त्याप्रमाणे बीडचे कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी पत्र पाठवून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील समाजकल्याण अंतर्गत असलेले शासकीय मुलींचे वसतिगृह उपलब्ध करून दिल आहे. याबाबत अधीक्षकांना तसे पत्रही दिले आहे. पवार यांच्यासह प्रशासन, पोलिसांकडून या वसतिगृहाची पाहणी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान, कोणताही नवीन आरोपी याचा आता कोरोना स्वॅब घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याला तात्पुरत्या कारागृहात ठेवले जाणार. त्यानंतर पुढील १४ दिवस तेथेच क्वारंटाईन असणार. १५ व्या दिवशी त्याला मुख्य कारागृहात प्रवेश दिला जाणार आहे. सोमवारी याला प्रत्यक्षात सुरूवात झाली असून एका आरोपीचा या कारागृहात प्रवेश झाला आहे.
आतली सुरक्षा कारागृहाची, बाहेर पोलीस
या तात्पुरत्या कारागृहात साधारण ४० कैद्यांची क्षमता आहे. यात आतील सर्व सुरक्षा ही कारागृह प्रशासनाची असणार आहे. यासाठी १ तुरूंग अधिकारी आणि पाच कर्मचारी नियूक्त केले आहेत. तर कारागृहाबाहेरील सुरक्षेच्या जबाबदारी ही पोलिसांवर असणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांचे असल्याचेही सूत्रांकडून समजते. तसेच सर्व इमारत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत आहेत.
समाजकल्याण मुलींचे वसतिगृहाची जागा
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महासंचालक यांच्या आदेशानूसार जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यववहार करून भेट घेतली. तात्पुरत्या कारागृहासाठी जागेची मागणी केली. त्याप्रमाणे समाजकल्याणच्या शासकीय मुलींचे वसतिगृहाची जागा मिळाली आहे. जवळपास ४० कैद्यांची यात क्षमता आहे. आतील सुरक्षा आमची तर बाह्य सुरक्षा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पोलिसांकडे दिली आहे.
- एम.एस.पवार, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, बीड
रिपोर्ट येईपर्यंत दक्षता
कारागृहाच्या पत्रानूसार आलेल्या प्रत्येक आरोपीचा स्वॅब घेतला जात आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात न ठेवता त्यांच्या क्वारंटाईन कारागृहात पाठविले जाते. रिपोर्ट येईपर्यंत दक्षता म्हणून कारागृहातही वेगळ्या खोलीत ठेवण्यास सांगितले आहे. अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड