CoronaVirus : 'धन्यवाद आणि शुभेच्छा'; बीड जिल्ह्यात एकाचवेळी कोरोना योद्धयांनी एकमेकांनाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:22 AM2020-05-06T10:22:55+5:302020-05-06T10:30:34+5:30
बुधवारी सकाळी १० वाजता सर्वांनी आहे त्या ठिकाणीच सोबतच्या सहकाऱ्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोना लढ्यात सर्वांनीच काम उत्कृष्ट केले. त्यामुळे प्रत्येकाने आज सकाळी १० वाजता एकाचवेळी एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एकमेकांच्या कामाचे कौतुक केले. आपले कौतूक झाल्यानंतर धन्यवाद मानून समोरच्यालाही शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाने हा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करण्यास आणखी बळ मिळाले आहे.
जिल्ह्यात आशा, अंगणवाडी सेविकांपासून ते जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यापर्यंत सर्वच यंत्रणा दिवसरात्र जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या या कामाला सर्वस्तरातून सलाम करण्यात आला. असे असले तरीही आपणही एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. याच उद्देशाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी एकाचवेळी सर्वांनी एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी १० वाजताची वेळ ठरविली. सर्वांनी एकत्र न येता ज्या ठिकाणी आहे, तेथेच एकमेकांच्या कामाचे कौतूक करून शुभेच्छा द्याव्यात. फुल देऊन एकमेकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करावी.
याबाबत सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आशा, अंगणवाडी सेविका यांना सुचना करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच बुधवारी सकाळी १० वाजता सर्वांनी आहे त्या ठिकाणीच सोबतच्या सहकाऱ्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. आपल्यातली आपल्यात कृतज्ञता व्यक्त करून उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने ही संकल्पना राबविली. ही संकल्पना नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून लढण्यासाठी उर्जा मिळणार आहे.
राजुरीत डीएचओंकडून सत्कार
ज्या त्या तालुक्यात, गावात, कार्यालयात एकमेकांनी सत्कार केला. सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी उत्साहाने या संकल्पनेला प्रतिसाद दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी बीड तालुक्यातील राजुरी आरोग्य केंद्रात जावून अधिकारी, कर्मचाºयांचा सत्कार केला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नरेश कासट, वैद्यकिय अधिकारी डॉ बेग, डॉ दत्तात्रय राऊत यांच्यासह परिचारिका, आशा आदींची उपस्थिती होती .