CoronaVirus : बीडमध्ये वाहनबंदीचा फार्स; पोलिसांचे आदेश कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 09:37 AM2020-03-30T09:37:10+5:302020-03-30T09:39:15+5:30
संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्रीसाठी सकाळी 7 ते 9.30 ही वेळ शिथिल करण्यात आली आहे.
बीड : गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी सामान्य लोकांना वाहनबंदी केली होती. जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्री साठी पायी प्रवास करा, विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहनही करण्यात आले होते. परंतु आज सकाळी पाहणी केली असता सर्रासपणे रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसून आली. यावरून पोलिसांचे वाहनबंदीचा आदेश कागदावरच राहिल्याचे दिसत आहे.
संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्रीसाठी सकाळी 7 ते 9.30 ही वेळ शिथिल करण्यात आली आहे. परंतु लोक या वेळेत विनाकारण जास्त बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. हे टाळण्यासाठी सुरुवातीला सामान्य व्यक्तींच्या वाहनाला इंधन देने बंद केले. तरीही फरक न पडल्याने वाहन जप्ती सुरू केली. सोमवारपासून एकही वाहन रस्त्यावर दिसणार नाही असे बीड पोलिसांकडून सांगण्यात आले होते. परंतु सकाळी शहरात पाहणी केली असता रस्त्यांवर सर्वत्र वाहनांची गर्दी दिसून आली. चौकाचौकात बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत होते.