coronavirus: शहरवासीयांना नाही जमले ते ग्रामस्थांनी मनावर घेतले; संचारबंदीचे ग्रामीण भागात गांभीर्याने पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:50 PM2020-03-24T14:50:34+5:302020-03-24T14:53:52+5:30
संचरबंदी काळात ग्रामस्थ घराच्या बाहेर पडत नसल्याचे चित्र
माजलगाव : कोरोनाची दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असताना मात्र शहरातील नागरिकांना याचे गांभीर्य नसून संचारबंदी असतानादेखील ते रस्त्यावर दिसत असून याउलट ग्रामीण भागातील नागरिकांना याचे गांभीर्य दिसून येत असल्याने ते घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
भारतात अनेक राज्यांसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असताना व शासनाने संचारबंदी लावलेली असताना माजलगाव शहरातील नागरिक मात्र या संचार बंदीची दखल घेत नसून ते या काळात विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे चित्र मागील तीन-चार दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. नागरिकांच्या अशा वागण्यामुळे प्रशासन व पोलिसांवरील ताण वाढतांना दिसून येत आहे. संचारबंदी शिथिलच्या काळात फळ भाजीपालावाले एकदम जवळ जवळ बसत असून ते गर्दीही जमवताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाला यांना उठवण्यात वेळ जात आहे. तर काही व्यापारी आपले दुकान अत्यावश्यक सेवेत येत नसतानाही दुकान उघडून बसलेले दिसून येत होते. या सर्व दुकाना बंद करण्यास सांगताना प्रशासनाची दमछाक होत आहे.
याउलट ग्रामीण भागातील परिस्थिती असून या ठिकाणचे नागरिक घरा बाहेर जाण्याचे टाळत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बोटावर मोजण्याइतके गाव वगळता अनेक गावात पोलिस बंदोबस्त नसतानादेखील नागरिक सतर्क राहत आहेत. व ते बाहेर पडण्याचे टाळत आहेत.
नागरिकांनी गर्दी टाळावी
संचारबंदी शिथीलच्या काळात व्यापाऱ्यांनी गर्दी जमु नये यासाठी दुकानासमोर एक रेषा मारून त्या रेषेतुनच एक एक ग्राहकांना सामान दिले पाहिजे.नागरिकांनी कोणत्याही किंमतीत गर्दी टाळली पाहिजे व आपणच आपल्याला एकमेकांपासून वेगळे केले पाहिजे.
-- डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार माजलगाव
नियम मोडल्यास गुन्हे दाखल करणार
संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच थांबावे विनाकारण रस्त्यावर येऊ नये . नागरिकांना सांगून सांगून देखील ते ऐकत नसतील तर त्यांना चोप दिल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय राहणार नाही व वेळ प्रसंगी गुन्हे देखील दाखल करण्यात येतील. तरी नागरिकांनी सबुरीने घेण्याची गरज आहे.
- श्रीकांत डिसले ,उपविभागीय पोलीस अधिकारी , माजलगाव