CoronaVirus: गाव-वाड्या सुरक्षित करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर; जनजागृतीसह सर्वेक्षणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 07:11 PM2020-04-06T19:11:18+5:302020-04-06T20:06:23+5:30
नोंदणी, फवारणी, जनजागृतीसह , काळजी घेण्याचे घरोघरी जाऊन केले जातेय आवाहन
- नितीन कांबळे
कडा : प्रशासन आणि जनता यातील मुख्य दुवा म्हणून ओळखले जाणारे ग्रामसेवक हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गाव, खेडी, वस्ती, वाडी, सुरक्षित करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ग्रामीण भागात जनजागृती सोबतच नोंदणी,सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
आष्टी तालुक्यात 125 ग्रामपंचायती असुन 78 ग्रामसेवक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गावे सुरक्षित राहावीत यासाठी फक्त जनजागृती न करता बाहेरून आलेले नातेवाईक, पाहुणे, स्थानिक नागरिक यांची चौकशी करून नोंद करून घेणे, ग्रामपंचायती अंतर्गत गाव वस्ती, वाडीत जंतूनाशक फवारणी, सॅनिटायझर वाटप,पाणीपुरवठा शुद्धीकरण करून सुरळीत करणे,सोडियम हायपोक्लोराईड ,हात धुण्यासाठी डेटॉल साबणाचे वाटप करणे,लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत व कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे.यासह घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे.
तालुक्यातील सर्वच ग्रामसेवक हे कर्तव्य बजावताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला सुरक्षा कवच असल्याचे दिसुन येत आहे. शासनाने जिव धोक्यात घालणाऱ्या ग्रामसेवक यांचा देखील विमा कवचसाठी विचार करणे गरजेचे असल्याचे धामणगांव येथील ग्रामसेवक गोवर्धन गिरी यांनी सांगितले.
ग्रामसेवकांना विमा जाहीर करावा
कोरोनाच्या कालावधीत काम करताना सुरक्षा म्हणून ग्रामसेवकास एक कोटींचा विमा शासनाने जाहीर करावा.अशी मागणी जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बळीराम उबाळे ,उपाध्यक्ष मधुकर शेळके,सचिव तिडके , आष्टी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब वाणी, उपाध्यक्ष आबासाहेब खिलारे,सचिव ,त्र्यंबक मुळीक यांनी केली आहे.