CoronaVirus : लढेंगे और जितेंगे भी; बीडमध्ये कोव्हीडच्या १०० खाटांमागे ८८ योद्धे सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:51 AM2020-04-28T11:51:26+5:302020-04-28T11:53:35+5:30
बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात २०० खाटा, अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात २५० खाटा, लोखंडी सावरगाव, केज आणि परळी येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्वतंत्र कोव्हीड रुग्णालये तयार
बीड : कोरोनाविरूद्ध लढा देण्यात आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात पाच स्वतंत्र रुग्णालये तयार केले आहेत. याची एकूण क्षमता ७५० खाटांची आहे. १०० खाटांमागे ८८ योद्धा कर्तव्य बजावणार आहेत. यात २० डॉक्टर, ४६ परिचारीका आणि २० कक्ष सेवक, २ औषध निर्माण अधिकारी, १ नोडल अधिकारी व एक डाटा एन्ट्री आॅपरेटर असा यांचा समावेश आहे. लवकरच ही रुग्णालये सेवेत सुरू केली जाणार आहेत.
बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात २०० खाटा, अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात २५० खाटा, लोखंडी सावरगाव, केज आणि परळी येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्वतंत्र कोव्हीड रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी लागणारे सर्व साधन सामग्री आणि साहित्य उपलब्ध केले आहे. तसेच एका रुग्णालयात १०० खाटांसाठी ८८ लोकांची स्वतंत्र टिम तयार केली आहे. हे सर्व लोक जीव धोक्यात घालून कोरोना संशयित अथवा कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी लढा देणार आहेत. तीन दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने सर्व कोव्हीड रुग्णालयांची तपासणी केली आहे. कामाबद्दल समाधानही व्यक्त केले होते. थोड्याफार त्रुटींबद्दल मार्गदर्शनही केले होते. आता अवघ्या आठवडाभरात हे रुग्णालये सेवेत पूर्णपणे उपलब्ध होणार आहेत. डॉ. सुखदेव राठोड, डॉ. अशोक हुंबेकर, डॉ. आय. व्ही. शिंदे, डॉ. राम देशपांडे, डॉ. बाबासाहेब ढाकणे, डॉ. महेश माने, डॉ. जयश्री बांगर, डॉ. सचिन आंधळकर आदींची टीम कोव्हीडसंदर्भात नियोजन करीत आहे.
२० खाटांचा आयसीयू कक्ष
१०० पैकी २० खाटांचा आयसीयू कक्ष तयार केला जाणार आहे. इतर ८० खाट (कोरोनाशी संबंधितच) हे इतर रुग्णांसाठी असणार आहेत. या कक्षात ६ वैद्यकीय अधिकारी आणि एका खाटामागे एक परिचारीका असणार आहे. इतर रुग्णांसाठी चार खाटांमागे १ परिचारीका असणार आहे. तसेच अतिदक्षतामधील दोन खाटांमागे एक कक्ष सेवक तर इतर खाटांसाठी आठ मागे एक कक्ष सेवक असणार आहे. याबाबत मार्गदर्शक सुचना उपसंचालकांनी दिल्या आहेत.
कोव्हीड रुग्णालयातील १०० खाटांसाठी स्वतंत्र स्टाफची नियूक्ती केलेली आहे. मार्गदर्शक सुचनांनूसार सर्व कार्यवाही केली जाईल. डॉक्टर, परिचारीका, कक्षसेवक, औषधनिर्माण अधिकारी, नोडल आॅफिसर, डाटा एन्ट्री आॅपरेटर हे या कोव्हीड रुग्णालयात कर्तव्य बजावतील. लवकरच हे सेवेत दिसतील.
- डॉ.अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक, बीड