गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकाचे पद गोत्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:53 IST2020-10-17T13:50:10+5:302020-10-17T13:53:32+5:30
Majalgaon Nagarpalika News तहसीलदार यांची दिशाभुल करुन रस्त्याच्या मध्यभागापासुन ७० फुट अंतर सोडुन अकृषि परवानगी मिळवली.

गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकाचे पद गोत्यात
माजलगाव : येथील नगर परिषदेचे सदस्य शेख मंजूर शेख चाँद यांनी तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथील गट नं. २० मधील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांचे पद धोक्यात आले आहे. याविषयी केलेल्या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या अंमलबजावणीला तहसीलदारांनी सुरुवात केली आहे.
माजलगाव- गढी दरम्यान राष्ट्रीय महामार्गालगत फुलेपिंपळगाव शिवारात गट नं. २० मध्ये असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर मजालगाव नगरपरिषदेचे सदस्य शेख मंजुर आणि सुनिल तौर यांनी अतिक्रमण करत जमिन बळकावल्याची तक्रार मनोज साळवे यांनी केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दखल घेतली. या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार वैशाली पाटील यांना दिले. यानुसार तहसीलदारांनी हे प्रकरण जमाबंदी विभागाला वर्ग करुन यात कार्यवाही अनुसरण्याचे आदेश १२ आक्टोंबर रोजी दिले आहेत.
तक्रारीनुसार तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी मंजूर व तौर यांच्याशी अर्थपुर्ण व्यवहार करत रस्त्यालगत १५ ते २० फुट जमीन असल्याचे जाणिपुर्वक दडवून ठेवले. तसेच तहसीलदार यांची दिशाभुल करुन रस्त्याच्या मध्यभागापासुन ७० फुट अंतर सोडुन अकृषि परवानगी मिळवली. अशी परवानगी मिळाल्याने गायरान जमीनीवर अतिक्रमण होत असल्याचे उघडकीस आल्याची बाब तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यानुसार ही कारवाई होत आहे. अतिक्रमण केलेली शासकीय जमीनवर भुखंड पाडून जास्त दराने विक्री केली असल्याची माहिती समोर येत आहे.
...तर नगरसेवक पद संपुष्टात येणार
जमीन खरेदी, अकृषी परवाना, शासनाच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून विक्री हा सर्व प्रकार २००६ मध्ये घडलेला आहे. शेख मंजूर यांनी पालिकेची निवडणूक २०१६ मध्ये लढवली आहे. निवडणुकीवेळी शासनाच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यानुसार शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे संबंधित व्यक्तीचे पद रद्द होते यानुसार शेख मंजूर यांचे पद धोक्यात आले आहे.