माजलगावात नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:50 AM2017-11-18T00:50:11+5:302017-11-18T00:52:11+5:30
माजलगाव येथील नगर परिषदेचे अध्यक्ष हे मनमानी स्वरुपाचा कारभार करीत असून, कुठल्याही प्रक्रियेमध्ये नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही तसेच मागील झालेल्या सभेचा वृत्तांत नगरसेवकांना दिला जात नाही, वेळेवर सभा घेतली जात नाही, असा आरोप करीत सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे अध्यक्ष विरुध्द नगरसेवक असा संघर्ष पेटल्याचे पाहवयास मिळत आहे.
माजलगाव : येथील नगर परिषदेचे अध्यक्ष हे मनमानी स्वरुपाचा कारभार करीत असून, कुठल्याही प्रक्रियेमध्ये नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही तसेच मागील झालेल्या सभेचा वृत्तांत नगरसेवकांना दिला जात नाही, वेळेवर सभा घेतली जात नाही, असा आरोप करीत सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे अध्यक्ष विरुध्द नगरसेवक असा संघर्ष पेटल्याचे पाहवयास मिळत आहे.
माजलगाव नगरपालिकेचे सत्तांतर होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या दरम्यान केवळ एकच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सर्वसाधारण सभा ही किमान तीन महिन्यात एकदा व्हायला हवी, मात्र मागील सात महिन्यांपासून सर्वसाधारण सभा झालेली नाही. मागे जी सभा झाली त्यात घेण्यात आलेल्या ठरावांची व प्रोसिडींगची मागणी वारंवार नगरसेवक करीत असताना देखील ती दिली जात नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजलगाव नगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी आंदोलन केले होते. त्याच बरोबर आयुक्तांनाही भेटुन या बाबत तक्रार केली होती. पंधरा दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाºयांना दोन दिवसांत विरोधक नगरसेवकांनी मागितलेली माहिती देण्यात यावी, असे आदेश दिले. मुख्याधिकाºयांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली.
नगराध्यक्षांच्या मनमानी विरुध्द दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी नगरसेवकांनी येथील आ. आर. टी. देशमुख यांची भेट घेऊन नगराध्यक्षांच्या तक्रारींचा पाढा वाचला होता. यात आमदारांनी मध्यस्थी करुन प्रकरण शांत केले होते. मात्र, त्यानंतरही नगराध्यक्षांची मनमानी सुरुच राहिल्याने शुक्रवारी पालिकेच्या कार्यालयामध्ये बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेवर विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी देखील बहिष्कार घातला. त्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर ओढवली.
अध्यक्ष अन् नगरसेवकांच्या वादात
माजलगाव शहराचा विकास सहाल चाऊस हेच करु शकतात, या अपेक्षेवर जनतेने चाउस यांना निवडून दिले. नगराध्यक्ष होऊन त्यांना जवळपास एक वर्ष उलटत असताना नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या वादात माजलगाव शहराचा विकास खुंटला आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, रस्त्यांची दुरवस्था, तुबलेल्या नाल्या आदींमुळे जनता मात्र होरपळून निघाली आहे.