लावलेल्या वांग्यांतून तोडणीचा खर्चही निघेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:59+5:302021-03-16T04:32:59+5:30
१५ किलोच्या कॅरेटला ३५ रुपयांचा भाव गेवराई : तालुक्यातील धोंडराई येथील शेतकरी संतोष ढोले यांनी त्यांच्या अर्धा एकर शेतात ...
१५ किलोच्या कॅरेटला ३५ रुपयांचा भाव
गेवराई : तालुक्यातील धोंडराई येथील शेतकरी संतोष ढोले यांनी त्यांच्या अर्धा एकर शेतात दीड महिन्यापूर्वी वांग्याची लागवड केली होती. सध्या हे पीक जोरदार आले असून, आता वांग्याची फळे निघण्याची वेळ आली असता, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजार बंद असल्याने ठोक व्यापाऱ्यांकडून वांग्यांच्या १२ ते १५ किलोचे कॅरेटला फक्त ३० ते ४० रुपये भाव मिळत आहेत. त्यामुळे झालेला खर्च तर सोडा, वांगे तोडणीला लावलेल्या मजुरांचे पैसेही निघत नसल्याचे धोंडराई येथील शेतकरी संतोष ढोले यांनी सांगितले.
संतोष ढोले यांनी अर्धा एक्कर जमिनीत केलेल्या वांगीच्या लागवडीवर ३० ते ३५ हजार रुपये खर्च केला. आता वांगे मोठ्या प्रमाणात आले असल्याने व ते तोडणी करण्याच्या वेळेलाच अडचणी आल्या आहेत. वाढत्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजार बंद असल्याने वांगी कुठे विकावी, असा प्रश्न ढोले यांना पडला. वांग्यांचा माल व्यापारी घेतात. मात्र, तो कवडीमोल भावाने. यात १२ ते १५ किलोच्या कॅरेटला फक्त ३५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. दोन रुपये किलो भाव मिळत असल्याने, झालेला खर्च सोडा, पण वांगी तोडणीला लावलेल्या मजुराचे पैसे निघणे अवघड झाल्याचे ढोले म्हणाले.
मागील वर्षी मार्चमध्ये एक एकरात भेंडीची लागवड केली होती. याला खर्च मोठ्या प्रमाणात केला. मात्र, कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन झाले. सर्व काही बंद झाल्याने भाजी पिकांसाठी केलेला खर्चही निघाला नव्हता, असा अनुभव त्यांनी सांगितला.
आंतरपीक फुलकोबीला भाव मिळेना
वांगीच्या पिकात आंतरपीक म्हणून फुलकोबीची लागवड केली होती. मात्र, भाव न मिळाल्याने ती फुलकोबी तोडून जनावरांना टाकावी लागली. या वर्षी कोरोनामुळे बाजार बंद नसते, तर वांग्यातून दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले असते.
मागील वर्षी पण भेंडीचे नुकसान झाले, तर आता वांग्याचे काटे शेतकऱ्यालाच टोचू लागले आहेत.
===Photopath===
150321\20210313_123712_14.jpg~150321\20210313_123649_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यातील संतोष ढोले नामक शेतकऱ्याने अर्धा एकरात वांगीचे पीक घेतले. मात्र कोरोनामुळे ठोक बाजारात भाव दोन रूपये किलो मिळत आहे.