बीडमध्ये शेतीच्या वाटणीवरून पुतणीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:42 AM2017-11-29T00:42:54+5:302017-11-29T00:44:24+5:30

सख्ख्या भावासोबत शेतीच्या वाटणीवरून असलेल्या वादातून चुलत्याने पत्नी आणि सासरच्या व्यक्तींच्या मदतीने पुतणीचा विष पाजून खून केल्याची घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथे घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी पाच जणांवर गुन्हा खुनाचा नोंदविण्यात आला.

Cottonseed blood from the distribution of seeds in Beed | बीडमध्ये शेतीच्या वाटणीवरून पुतणीचा खून

बीडमध्ये शेतीच्या वाटणीवरून पुतणीचा खून

googlenewsNext
ठळक मुद्दे चुलता-चुलतीसहित पाच जणांवर खुनाचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सख्ख्या भावासोबत शेतीच्या वाटणीवरून असलेल्या वादातून चुलत्याने पत्नी आणि सासरच्या व्यक्तींच्या मदतीने पुतणीचा विष पाजून खून केल्याची घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथे घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी पाच जणांवर गुन्हा खुनाचा नोंदविण्यात आला. अद्याप सर्व आरोपी फरार आहेत.

बबिता व्यंकटी भताने (वय १९) असे या प्रकरणातील मयत युवतीचे नाव आहे. परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथील व्यंकटी हरिभाऊ भताने आणि सख्खा भाऊ विठ्ठल हरिभाऊ भताने यांची शेजारी-शेजारी प्रत्येकी साडेआठ एकर शेतजमीन आहे. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता विठ्ठल भताने जेसीबी मशिनच्या साह्याने बांध फोडून व्यंकटी यांच्या ताब्यातील जमिनीपैकी अर्धा एकरवर कब्जा करू लागला. यावरून दोघा भावांत वाद सुरु झाला. यावेळी विठ्ठलची पत्नी जयश्री हिने व्यंकटी यांच्या हाताला चावा देखील घेतला. परंतु, भावकीतील अन्य लोकांनी मध्यस्थी करून भांडण तत्काळ सोडविले आणि एकत्र बसून आपापसात तडजोडीने वाद मिटविण्याचे ठरले.

२५ नोव्हेंबर रोजी विठ्ठलचे सासरे आणि मेहुणे अस्वलआंब्यात आल्याचे व्यंकटी यांना समजले. हे सर्वजण वाद मिटविण्यासाठी आले असतील असे समजून रात्री ११ वाजता व्यंकटी भताने गावातील चार प्रतिष्ठित माणसांना बैठकीस बोलाविण्यासाठी गेले. त्यानंतर विठ्ठल भताने हा त्याचा सासरा सोपान गणपती नागरगोजे, मेहुणे बालासाहेब आणि गोविंद सोपान नागरगोजे (तिघेही रा. माळहिवरा) व पत्नी जयश्री यांच्यासमवेत व्यंकटी भताने यांच्या घरात घुसला. यावेळी घरात फक्त व्यंकटी यांची पत्नी ठकूबाई आणि मुलगी बबिता या दोघीच होत्या.

पाचही आरोपींनी व्यंकटी कुठे गेला, त्याचे हातपाय तोडून गळ्यात टाकूत, त्याची जीभ कापूत असे म्हणत ठकूबाई यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलगी बबिता आईला वाचविण्यासाठी मध्ये पडली असता पाचही आरोपींनी संगनमताने तिला खाली पाडून बळजबरीने विषारी द्रव पाजले. हे पाहून ठकूबाईंनी आरडाओरड सुरु केल्याने शेजारची माणसे तिथे आल्यामुळे सर्व आरोपींनी पळ काढला.

ठकूबाईंनी शेजारच्या लोकांच्या साह्याने अत्यावस्थ बबिताला तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु सोमवारी रात्री ११.४५च्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे बबिताची आई ठकूबाई व्यंकटी भताने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून सोपान गणपती नागरगोजे, बालासाहेब सोपान नागरगोजे, गोविंद सोपान नागरगोजे, विठ्ठल हरिभाऊ भताने आणि जयश्री विठ्ठल भताने यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


 

Web Title: Cottonseed blood from the distribution of seeds in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.