प्राणीमित्रांच्या धाडसाने मांजरास जीवदान; ताटातूट झालेल्या माय-लेकरांची अखेर भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 02:05 PM2023-05-02T14:05:23+5:302023-05-02T14:05:57+5:30
प्राणीमित्रांनी जीवाची बाजी लावून पाळीव मांजराला दिले जिवदान
- नितीन कांबळे
कडा - घरातून बेपत्ता झालेली पाळीव मांजर खोल जुन्या बारवात पडल्याने नवजात पिले दुधासाठी व्याकूळ होऊन ओरडत होती. हा मन हेलावून टाकणारा प्रसंग समजताच जीवाची बाजी लावून प्राणीमित्र नितीन आळकुटे यांनी ३० फुट जुन्या बारवात उतरून मांजरास जीवदान दिले. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान बॅटरीच्या उजेडात मांजरास बाहेर काढण्यात आल्यानंतर मांजर अन लेकरांची भेट झाली. हा मनाला पाझर फुटणारा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील सचिन राऊत यांच्याकडे पाळीव मांजर आहे. मांजरीनी पिलांना जन्म देऊन आठवडा झाला आहे. दरम्यान, घराच्या परिसरात फिरतांना मांजर अचानक ३० फूट खोल पडक्या बारवात पडली. तीन ते चार दिवस मांजर घरी न परत आल्याने पिले दुधासाठी व्याकुळ होऊन ओरडत होती. तर मांजर बारवात अन्न पाण्याविना मृत्यूशी झुंज देत होती. हे चित्र मालक सचिन राऊत यांच्या नजरेत पडताच कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना त्यांनी माहिती दिली.
त्यानंतर सोमवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान बॅटरीच्या उजेडात दोरीच्या सहाय्याने आळकुटे यांनी जिवाची बाजी लावून मांजरास सुखरूप बाहेर काढले. बाहेर पडताच पिलांना जवळ घेऊन दुध दिले. हा मन हेलावून टाकणारा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. जिवाची बाजी लावली पण ताटातूट झालेल्या माय लेकरांची भेट घडवून आणली याचे मनस्वी समाधान मिळाले. मायलेकरांनासोबत पाहून डोळ्यात अश्रू आल्याच्या भावना प्राणीमित्र नितीन आळकुटे यांनी व्यक्त केल्या.