ठोंबरे दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 02:24 PM2019-09-19T14:24:48+5:302019-09-19T14:26:49+5:30
ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती.
केज (जि. बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष आ. प्रा. संगीता ठोंबरे व चेअरमन डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरु द्ध केज न्यायालयाने विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशास अंबाजोगाई येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिली.
केज येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतिगरणीचे कथित संचालक गणपती कांबळे यांनी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्षा आ. प्रा. संगीता ठोंबरे व चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर १५६(३) सीआरपीसी नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केज न्यायालयात केली होती.
आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याचे नमूद करुन पुराव्यादाखल त्यांनी अश्विनी पवार फॉरेन्सिक तज्ज्ञाचा अहवाल व शपथ पत्र जोडले होते. या याचिकेवर ११ सप्टेंबर रोजी सुनावणीनंतर चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे व आ. संगीता ठोंबरे यांच्या विरोधात कलम ४२०,४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश केज प्रथम वर्ग न्या. थोरात यांनी दिले होते.
या आदेशाच्या नाराजीने ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या.एस. एस. सापत्नेकर यांच्या न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. ठोंबरे यांच्या वतीने अॅड. जे. व्ही. गाडे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. बी. जी. केंद्रे, अॅड. एच. डी. राऊत, अॅड. कुरडे, अॅड. केशव काळे, अॅड. एल ए माने यांनी सहकार्य केले.