खुरपुडेचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला; लाच प्रकरणात २२ दिवसांपासून आहे फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 06:29 PM2018-04-25T18:29:51+5:302018-04-25T18:29:51+5:30
व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता.
बीड : व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ती फरार झाली. जामिन मिळावा यासाठी तिने बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, २२ दिवस उलटूनही ती अद्याप एसीबीच्या हाती लागलेली नाही. तिच्या अटकेसाठी एसीबीची धावपळ सुरू आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे ही बीडमध्ये चांगलीच वादग्रस्त ठरली होती. खेळाडूंना सुविधा देण्यासह कार्यालयीन कामकाज सुधारण्यात खुरपुडेला अपयश आले होते. कामकाज सुधारण्याकडे दुर्लक्ष करून विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांना देण्यासाठी ही शिपायामार्फत लाच स्विकारत असल्याचे एसीबीच्या कारवाईवरून समोर आले होते. विशेष म्हणजे यापूर्वी ेदेखील याच कार्यालयातील नानकसिंग बस्सी हा क्रीडा अधिकारी टक्केवारीने पैसे घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. खुरपुडे हिने बस्सीची अनेकवेळा पाठराखनही केली होती. त्यामुळे बस्सीच्या प्रकरणात खुरपुडेचाही संबंध असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. सध्या हे प्रकरण एसीबीकडे तपासावर आहे.
दरम्यान, लाच स्विकारल्याचा गुन्हा दाखल झालेली माहिती मिळताच नंदा खुरपुडे ही फरार झाली. एसीबीने तिच्या लातूर येथील घराची झडती घेतली. तसेच अटकेसाठी पथकही रवाना केले होते. परंतु ती हाती लागली नाही. पोलिसांपासून बचाव करीत खुरपुडे हिने बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनसाठी अर्ज केला होत. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. त्यामुळे ती आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता विधीतज्ज्ञांमधून व्यक्त केली जात आहे.
लवकरच अटक होईल
आम्ही खुरपुडेच्या मागावर आहोत. लवकरच अटक केली जाईल. कायदेशीर मार्गाने तपास सुरू आहे.
- बाळकृष्ण हनपुडे पाटील, उपअधीक्षक, एसीबी, बीड