बहीण-भावाचा खेळ अधुरा राहिला, छतात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 10:42 PM2022-03-12T22:42:00+5:302022-03-12T22:44:35+5:30
माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील घटना
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव: तालुक्यातील टालेवाडी येथील दोन चिमुकले छतावर चढत असताना छतामध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे चुलत बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
माजलगाव -- तेलगाव रस्त्यावर असलेल्या टालेवाडी येथील साक्षी भारत बडे वय 12 वर्षे व सार्थक अशोक बडे वय 8 वर्षे हे भरत बडे यांच्या घरात खेळत असतांना छतामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने या दोघा सख्या चुलत बहिण-भावाचा मृत्यू झाला असल्याची घटना दुपारी घडली असावी असा अंदाज त्यांच्या घरच्यांनी वर्तवला आहे.
यांच्या घराच्या बाजूला असलेल्या डीपी वरून मागील अनेक वर्षापासून करंट उतरत असल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत गावातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी कळवुन देखील त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. शनिवारी दुपारी हे दोघे चिमुकली बहिण भाऊ खेळत असताना त्यातील सार्थक हा छतावर जाण्यासाठी चढत असताना त्याला शॉक लागला असावा व त्यानंतर साक्षी ही त्याला पाहायला गेली असता तिला देखील करंट लागल्याने हे दोघे एकमेकांच्या अंगावर पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
सदरील डीपीवरून करंट उतरल्यास या भागात असलेल्या 40 ते 50 घरांमध्ये करंट उतरतो व या करंट मुळे घरातील पंखे व बल्प ऑटोमॅटिक फिरत असल्याचे गावकरी सांगताना दिसत होते. या दोघांना माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोघांवर रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांच्या मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे