स्वत:चं झाकून, दुसऱ्याचं पहायचं वाकून..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:34 AM2021-09-19T04:34:40+5:302021-09-19T04:34:40+5:30
बीड जिल्ह्यातील एक कारखाना दोनदा दिवाळखोरीत निघाला. त्यानंतर कारखान्याच्या मंडळाने राज्य बँक, जिल्हा बँकेकडे आर्थिक मदत मागितली. परंतु कोणीही ...
बीड जिल्ह्यातील एक कारखाना दोनदा दिवाळखोरीत निघाला. त्यानंतर कारखान्याच्या मंडळाने राज्य बँक, जिल्हा बँकेकडे आर्थिक मदत मागितली. परंतु कोणीही मदत दिली. तरीही काही उसाचे गाळप करून कारखाना शेतकरी, कामगारांसाठी चालू केला. यानंतर शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी कायदेशीर परवानगी घेऊन कारखान्याची जमीन विकून पैसे अदा केले. हे शेतकरी, कामगारांच्या भल्यासाठी केले? असा दावा त्यांनी केला. पण, तेथेही राजकारण आडवे आले. जिरवाजिरवीच्या राजकारणात पुन्हा दुसऱ्यांनी जमीन विक्रीला स्टे आणला. त्यातही स्वत:च्या हितापेक्षा शेतकरी, कामगारांचे हित पुढे आले. यासाठी काही संघटनांनाही पुढे केले. यातून आम्हीच कसे शेतकरी, कामगारांचे भले करतो, असा हा कळवळा. परंतु दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात, असे म्हणतात. राज्यातील सहकार क्षेत्राची कोणी, कशी वाट लावली हे सर्वांना परिचित आहे. कोणी कारखाने विकून खाल्ले. कोणी स्वत:च्या नावावर केले. आजही कोणत्या कारखान्याकडे कोणत्या बँकेची किती कोटीत कर्ज आहे याचे आकडे पाहिले तर अनेकांचे डोळे फिरतात. यात बीड जिल्ह्यातील इतर कारखाने, नेतेही मागे नाहीत. पण हे कोणासाठी केले तर शेतकरी, कामगारांच्या हितासाठी केले हाच दावा प्रत्येक जण करतो. यात शेतकरी, कामगारांचे कधी भले झालेले दिसत नाही. परंतु ‘त्यांचे’ मात्र भले झाले. सहकाराच्या राजकारणात इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा स्वत:चे पाय किती खोलात आहेत याचा विचार करायला हवा. मग जनताच म्हणते, ‘स्वत:चे ठेवायचे झाकून...दुसऱ्याचे पहायचे वाकून..!’ हे बरे नव्हे.