५० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:50+5:302021-05-04T04:14:50+5:30
परळी : येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ५० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू ...
परळी : येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ५० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. सध्या येथे ऑक्सिजनचे २५ बेड कार्यान्वित केले असून, आणखी २५ बेडला ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे सेंटर १२ दिवसांपूर्वी केवळ ४८ तासांत पालकमंत्री मुंडे यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने उभारले होते. मात्र, ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध न झाल्याने हे सेंटर सुरू करण्यास विलंब लागला होता. लोकमतने या संदर्भात वृत प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आणि अखेर हे सेंटर सुरू झाले.
सोमवारी पालकमंत्री मुंडे यांनी वॉर्डांमध्ये जाऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेत कोणताही रुग्ण गंभीर होण्याआधी इथेच योग्य उपचार मिळावेत. यासाठी गरज भासल्यास परळीतील खासगी डॉक्टर्सची काही तासांसाठी सेवा उपलब्ध करून घेऊ, असे मुंडे म्हणाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश कुर्मे, अंबाजोगाईचे उप विभागीय पोलीस आधिकारी सुनील जायभाये, परळी तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण मोरे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर उपस्थित होते.
रुग्णालयात ५० रुग्णांना एकाच वेळी सेवा देण्याच्या प्रमाणात पॅरा मेडिकल स्टाफ उपलब्ध करण्यात आला आहे. त्यांना आवश्यक सामग्री, पीपीई किट व अन्य साहित्याची कमतरता भासणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश डॉ. गित्ते यांना दिले. तर रुग्णालयात सोमवारपासून २५ रुग्ण दाखल होतील त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होऊ नये यासह अन्य सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुंडे यांनी यावेळी पोलीस उपअधीक्षक जायभाये यांना दिले. तसेच सर्व डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ व अन्य कर्मचाऱ्यांना सेवा कार्यासाठी मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
===Photopath===
030521\sanjay khakare_img-20210503-wa0008_14.jpg