कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल; बाधित रुग्ण बसले व्हरांड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:10 IST2020-08-11T17:08:28+5:302020-08-11T17:10:48+5:30
प्रशासनाकडे उपाययोजना नसल्याचे उघड

कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल; बाधित रुग्ण बसले व्हरांड्यात
बीड : बीड शहरातील व्यापारी, दुकानदारांची अँटिजन तपासणी केल्यावर एकाचवेळी १३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. परंतु अगोदरच आयटीआयमधील कोवीड केअर सेंटर रुग्णांनी हाऊसफुल्ल झालेले होते. त्यामुळे या नवीन रुग्णांना अक्षरश: व्हरांड्यात बसावे लागले. प्रशासन सतर्क नसल्याचे या प्रकारावरून चव्हाट्यावर आले आहे. रविवारी रात्री बाधित रुग्णांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा मोठा त्रास सहन करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून आपण कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करायला तयार असल्याचा दावा केला जात आहे. खाट आणि सर्व सुविधा असल्याचा बोभाटा केला जात आहे. प्रत्यक्षात रुग्णांच्या तक्रारी वाढत आहेत. रविवारी रात्री तर एकाचवेळी १३७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आयटीआयमधील कोवीड केअर सेंटरमध्ये राहण्यासह जागा नव्हती. कोणी व्हरांड्यात तर कोणी रिकामी जागा दिसेल तिथे बसत होते. यात महिलांचाही समावेश होता. या प्रकारामुळे प्रशासनाकडे उपाययोजना नसल्याचे चव्हाट्यावर आले. सर्वत्र आरडाओरड झाल्यानंतर मध्यरात्री सुमारास बार्शी रोड, एमआयडीसी व नगर रोड भागात केअर सेंटरची व्यवस्था झाली. या सर्व रुग्णांना नंतर तिकडे हलविण्यात आले. तोपर्यंत त्यांना त्रास सहन करावा लागला.
सोयी, सुविधांचाही मोठा अभाव
कोवीड केअर सेंटरला राहण्यासह इतर सुविधाही नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. तसेच उपचाराकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकाराने जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार आणि अपयश चव्हाट्यावर आले आहे. अधिकाऱ्यांकडून केवळ सुविधा असल्याचा बोभाटा केला जात असल्याचे दिसत आहे.
आमच्या सीसीसीमध्ये १५० ची क्षमता आहे. रुग्ण जास्त झाल्याने जागा नव्हती. त्यामुळे ते बाहेर होते. नंतर त्यांना दुसऱ्या कोवीड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. - डॉ.अमित बायस, प्रमुख, कोवीड केअर सेंटर आयटीआय बीड